परराष्ट्र मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाच्या माध्यमातून जखमींना आवश्यक मदत पुरवली जात आहे. मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अडकलेल्या प्रवाशांसाठी इंडिगोची विशेष उड्डाणे
दरम्यान सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी IndiGo या विमान कंपनीने 3 मार्च रोजी जेद्दाहहून भारतात 10 विशेष दिलासा उड्डाणांचे नियोजन केले आहे. ही उड्डाणे आवश्यक सरकारी परवानग्या आणि हवाई क्षेत्रातील परिस्थितीवर अवलंबून असतील, असे कंपनीने स्पष्ट केले.
advertisement
प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगो कंपनी जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी (Consulate General of India, Jeddah) समन्वय साधत आहे. अडकलेल्या प्रवाशांची नोंदणी, प्रवासाची कागदपत्रे आणि अन्य आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
तेलवाहू टँकरवर हल्ला, 20 कर्मचाऱ्यांमध्ये 15 भारतीय
स्कायलाइट नावाच्या तेलवाहू टँकरवर ओमानच्या किनाऱ्यालगत होर्मुज सामुद्रधुनीजवळ हल्ला झाल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाली असून सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अमेरिका–इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांनंतर इराणकडून आखात क्षेत्रात सुरू असलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा दुर्मिळ सागरी हल्ला घडला आहे.
होर्मुज सामुद्रधुनीत नेमके काय घडले?
ओमानच्या मेरीटाइम सिक्युरिटी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार पलाऊ ध्वजाखालील स्कायलाइट टँकरवर मुसंदम गव्हर्नरेटमधील खासाब बंदराच्या उत्तरेस सुमारे पाच नॉटिकल मैलांवर लक्ष्य करण्यात आले. या जहाजावरील सर्व 20 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यात 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे. प्राथमिक अहवालानुसार चार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी कर्मचाऱ्यांना मस्कत येथील वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ओमानच्या रॉयल नेव्ही आणि सागरी सुरक्षा पथकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले.
