पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढत असून, आता हे प्रकरण केवळ राजकीय न राहता गंभीर कौटुंबिक स्वरूप असल्याचे संकेत मिळत आहेत. रोहिणी आचार्य यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणि त्यांनी घर सोडल्यानंतर आता कुटुंबातील आणखी तीन बहिणी रागिनी, चंदा आणि राजलक्ष्मी यांनी आपल्या मुलांसह पटनाहून दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. कुटुंबातील चार मुलींनी पटना येथील निवासस्थान सोडल्याने आरजेडी (RJD) वर्तुळात गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
advertisement
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी नुकताच कुटुंबाशी संबंध तोडण्याचा आणि राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी त्यांचे बंधू तेजस्वी यादव आणि त्यांच्या दोन जवळच्या सहकाऱ्यांवर संजय यादव (RJD खासदार) आणि रमीज गंभीर आरोप केले.
रोहिणी यांच्या दाव्यानुसार या लोकांनी त्यांचा अपमान केला, गलिच्छ शिवीगाळ केली आणि चप्पल उचलून मारण्याचा प्रयत्न देखील केला. सर्जन आणि डॉक्टर असलेल्या रोहिणी ज्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत सारणमधून आरजेडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, त्यांनी एका भावूक पोस्टमध्ये म्हटले की त्यांना माहेरून हाकलून देण्यात आले आहे आणि त्या अनाथ झाल्या आहेत. आत्मसन्मानाला धक्का पोहोचल्यामुळे आणि सत्य बोलल्याची शिक्षा मिळाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले.
या वादात रोहिणी आचार्य यांच्या विशेष निशाण्यावर तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव आणि त्यांच्या कोर टीममधील रमीज हे आहेत. आरजेडीच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही या दोघांच्या नावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे कुटुंबातील गुन्हा मानला जात असल्याचा आरोप रोहिणी यांनी केला आहे.
या कौटुंबिक वादावर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनीही मोठे भाष्य केले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी लालू कुटुंबाचे दुःख समजू शकत असल्याचे सांगितले. लालूजींचे कुटुंब माझेही कुटुंब आहे, असे म्हणत चिराग पासवान यांनी एका मुलीला स्वतःच्या घरात अपमान केल्यावर किती दुःख होते, याची जाणीव व्यक्त केली. मुलगा आणि मुलगी या दोघांचा समान हक्क आहे, असे सांगत त्यांनी लालू कुटुंब लवकरच एकत्र यावे यासाठी प्रार्थना केली आहे. आरजेडीच्या मोठ्या निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा कौटुंबिक वाद पक्षासाठी आणखी एक मोठे आव्हान बनला आहे.
