जर तुम्हाला वाटत असेल की हे लॉकडाऊनदेखील कोरोनामुळे लागू करण्यात आलं आहे, तर तसं नाही. यावेळी एक बिबट्या यासाठी कारणीभूत ठरला आहे. धौलपूरच्या मंगरोळ शहरातील लोकांना घरातच राहण्यास सांगितलं गेलं आहे. परिसरात बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्याने आतापर्यंत दोन जणांवर हल्ला केला आहे. मात्र वनविभागाला त्याला पकडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे आता लोकांना सुरक्षिततेसाठी घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे.
advertisement
काही काळापूर्वी उदयपूरमध्ये बिबट्या दिसला होता. आता धौलपूरमध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केला आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शहरात रात्री उशिरा एका घराच्या मालकिणीला शेडमधून आवाज आल्यावर ती अंगणात डोकावायला गेली. जनावरं खूप आवाज करत होती. तिने आत जाऊन पाहिलं असता महिलेला बिबट्या दिसला, हे पाहून ती हादरली. जीव वाचवण्यासाठी महिलेनं तात्काळ तिथून पळ काढला.
महिलेनं आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. रात्रीच्या अंधारात बिबट्याची शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र तो कोणालाच दिसला नाही. सकाळी देखील टीम त्याचा शोध घेताना दिसली. सध्या टीमने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका, अशी विनंती करण्यात आली आहे.