जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होतोय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅली, राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यानंतर देशभरातील मतदारांनी कुणाला कौल दिलाय? हे अवघ्या काही वेळात अखेर समोर येत आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार? की इंडिया आघाडीला यश मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.
advertisement
निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर. राज्यात महायुती की मविआ कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीनं आपण राज्यात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय. तर मविआ नेतेही आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करताहेत. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. बारामती, माढा, शिरूर, बीड, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सांगली या मतदारसंघामध्ये कांटे की टक्कर झाली. अनेक मतदारसंघामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला याचा अंदाज छातीठोकपणे कुणालाही वर्तवता येत नाही. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर या मतदानात दिसणार का याची चर्चा आहे. तर राज्यात वंचितचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकताही आहे. काहीच वेळात हा निकाल समोर येणार आहे.