इतर भारतीय राजकारण्यांच्या तुलनेत त्या पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री असूनही त्या मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये राहत नाही. पगार घेत नाहीत आणि दिवसातून एकदाच जेवण करतात. त्यांचा पायी चालण्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पायी चालणाऱ्या व्यक्तीला जवळपास धावावं लागतं. ममता बॅनर्जी आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. त्यांचा राजकीय इतिहास बघता हे स्पष्ट होतं की, मोठ्या नेत्यांचा सामना करताना त्या कधीही घाबरत नाहीत.
advertisement
गेल्या 30 वर्षांपासून ममतांना जवळून पाहणारे 'न्यूज 18 बांगला'तील ज्येष्ठ पत्रकार बिस्वा मजुमदार म्हणतात की, त्या खरोखरच वेगळ्या आहेत. योद्धा आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्या हार मानत नाही. त्यांच्या मनात माणुसकी आहे आणि त्या सामान्य जनतेची सहज भेट घेतात. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्या तळागाळातील नेत्या आहेत.
बंगालमधील आणखी एक पत्रकार सिद्धार्थ सरकार ममतांबद्दल म्हणाले की, त्या अजूनही आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या सरकारी निवासस्थानात त्या राहत नाही. त्यांची जीवनशैली अतिशय साधी आहे. गरजेपोटी त्या आयफोन वापरतात पण त्यांना लक्झरी आवडत नाही. त्या मुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांना दिला जाणारा पगार घेत नाहीत.
त्या सकाळी लवकर उठतात. सहसा दिवसभरात त्या काहीही खाणं टाळतात. दिवसा त्या चहा पितात आणि मुरमुरे खातात. रात्रीच्या जेवणात साधं अन्न घेतात. ज्यामध्ये वरण, भात, भाजी आणि पोळीचा समावेश असतो. गेल्या अडीच ते तीन दशकांपासून त्यांच्या जेवणाचं हेच स्वरूप आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांनासुद्धा शाही जेवण दिलं जात नाही. त्यांना फक्त स्थानिक जेवण वाढलं जातं.
घरी येणाऱ्यांना चहा आणि मुरमुऱ्यांचा नाश्ता दिला जातो. मसालेदार आणि चटपटीत बंगाली जेवणाऐवजी ममतांना तेल आणि मसाले नसलेले पदार्थ आवडतात. आपल्या समर्थकांमध्ये 'दीदी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ममता अनेक कारणांमुळे साधेपणासाठी ओळखल्या जातात.
तत्काळ निर्णय घेतात
बिस्वा मजुमदार सांगतात की, त्या काहीशा रागीट स्वभावाच्या आहेत. पण, त्यांना गोष्टी समजत नाहीत, असा याचा अर्थ होत नाही. वेगवेगळा काळ आणि वातावरणाची त्यांना खूप चांगली समज आहे आणि त्यानुसारच त्या वागतात. मनाने त्या खूप चांगल्या आहेत. कोणताही निर्णय घेताना त्या जास्त वेळ घेत नाहीत. पण, तत्काळ घेतलेले निर्णयसुद्धा विचारपूर्वक घेतलेले असतात.
जयप्रकाश नारायण यांच्या कारवर चढण्याचं धाडस
ममता यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसच्या माध्यमातून केली होती. पण, नंतर बंगालमधून काँग्रेसला संपवण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आताही त्या काँग्रेसवर सातत्याने टीका करतात. काँग्रेसकडे दुर्लक्ष करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. आताही काँग्रेसने ममतांच्या तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये इंडिया महाआघाडीत सामील करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, त्यांनी सुरुवातीपासूनच ही कल्पना नाकारली. आता फार कमी लोकांना आठवत असेल की, एकेकाळी ममता या बंगाल काँग्रेसमधील तरुण आणि तडफदार नेत्या होत्या. त्यांनी समाजवादी चळवळीचे प्रमुख जयप्रकाश नारायण यांच्या गाडीच्या बोनेटवर चढून निषेध करण्याचं धाडस केलं होतं. असं करून त्यांनी देशभरातील सर्वांनाच चकित केलं होतं.
कॉलेजमध्ये असताना मिळालं महिला काँग्रेसचं सरचिटणीसपद
70 च्या दशकात त्यांना राज्य महिला काँग्रेसचं सरचिटणीस बनवण्यात आलं. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये शिकत होत्या. ममता यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर गरिबीशी झुंज देत असताना त्यांनी दूध विकण्याचंही काम केलं. लहान भावंडांचं संगोपन करण्यासाठी आईला मदत करणं हा एकमेव मार्ग होता. ममता बॅनर्जी यांनी दक्षिण कोलकाता येथील जोगमाया देवी कॉलेजमधून इतिहास विषयात ऑनर्स पदवी मिळवलेली आहे. नंतर त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीतून इस्लामिक इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी श्री शिक्षायतन कॉलेजमधून बीएड आणि कोलकाता येथील जोगेश चंद्र चौधरी लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे.
देशातील सर्वांत तरुण खासदार
1970 मध्ये ममता यांचा सक्रिय राजकीय प्रवास सुरू झाला. 1976 ते 1980 या काळात त्या महिला काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. 1984 मध्ये, ममतांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीएम) ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांना जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभूत केलं होतं. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या काळात सोमनाथ हे सीपीएममधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. या विजयासह त्या देशातील त्या काळातील सर्वांत तरुण खासदार ठरल्या होत्या.
काँग्रेसविरोधामुळे पुढच्या टर्ममध्ये पराभव
सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केल्यानंतर ममता बॅनर्जी यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसचं सरचिटणीस बनवण्यात आलं. 1989 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेमुळे ममता यांचा जादवपूर लोकसभा मतदारसंघात मालिनी भट्टाचार्य यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर दोन वर्षांनी, 1991च्या निवडणुकीत त्यांनी कोलकाता दक्षिणची जागा जिंकली. त्यांनी आत्तापर्यंत 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 मध्ये दक्षिण कलकत्ता (कोलकाता) मतदारसंघातील लोकसभेची जागा जिंकली आहे.
काँग्रेसशी फारकत आणि तृणमूल काँग्रेसची स्थापना
1991 मध्ये कोलकाता येथून लोकसभेवर निवडून आलेल्या ममतांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाली. नरसिंह राव सरकारमध्ये त्यांना मनुष्यबळ विकास, युवा व्यवहार आणि महिला व बालविकास खात्याचं राज्यमंत्री बनवण्यात आलं होतं. या सरकारमध्ये त्यांना क्रीडामंत्री होण्याचीही संधी मिळाली. नंतर आपल्याच सरकारवर नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिला.
1993 मध्ये त्यांना या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं. हळूहळू त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल राग तयार होतं होता. बंगालमध्ये काँग्रेस सीपीएमच्या हातातील बाहुलं असल्याचा आरोप एप्रिल 1996-97 मध्ये त्यांनी केला होता. 1997 मध्ये काँग्रेसपासून त्या कायमस्वरुपी वेगळ्या झाल्या. 1 जानेवारी 1998 रोजी त्यांनी 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या त्या अध्यक्षा झाल्या. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीने आठ जागा जिंकून काँग्रेस आणि सीपीएमला आव्हान दिलं.
भाजपबद्दलही वाढली नाराजी
पुढे त्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सहभागी झाल्या. त्यांना रेल्वे मंत्रिपदही मिळालं होतं. पण, 2001च्या सुरुवातीला भाजपविरोधात एका स्टिंग ऑपरेशनचा खुलासा झाल्यानंतर त्या संतप्त झाल्या. त्या एनडीएतून बाहेर पडल्या. त्यानंतर जानेवारी 2004 मध्ये कोणतंही स्पष्ट कारण न देता त्या पुन्हा सरकारमध्ये सहभागी झाल्या.
20 मे 2004 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये टीएमसीच्या वतीने फक्त ममता निवडणूक जिंकू शकल्या होत्या. त्यांचे इतर सर्व उमेदवार पराभूत झाले होते. या वेळी त्यांना कोळसा आणि खाण मंत्रिपद देण्यात आलं. राज्यातील बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्याच्या विरोधात त्यांनी 20 ऑक्टोबर 2005 रोजी आंदोलन केलं.
मोठी राजकीय उलथापालथ
2005 मध्ये ममतांना मोठा राजकीय फटका सहन करावा लागला. महापौरांनी तृणमूल पक्ष सोडल्याने ममतांच्या पक्षाने कोलकाता महानगरपालिकेवरील नियंत्रण गमावलं. 2006 च्या विधानसभा निवडणुकीतही तृणमूल काँग्रेसचे अर्ध्याहून अधिक आमदार निवडणुकीत पराभूत झाले होते. नोव्हेंबर 2006 मध्ये, सिंगुरमध्ये टाटा मोटर्सच्या प्रस्तावित कार प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून ममतांना जबरदस्तीने रोखण्यात आलं होतं. याच्या निषेधार्थ त्यांच्या पक्षाने धरणे, निदर्शने आणि संपही केले.
2009च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ममतांनी पुन्हा एकदा यूपीएचा हात धरला. या आघाडीला बंगालमध्ये 26 जागा मिळाल्या आणि ममता पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल झाल्या. त्यांना दुसऱ्यांदा रेल्वे मंत्रिपद मिळालं. रेल्वेमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला होता. रेल्वेबाबत लोकप्रिय घोषणा आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी त्या ओळखल्या जातात. 2010च्या महानगरपालिका निवडणुकीत तृणमूलने पुन्हा एकदा कोलकाता महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
पुन्हा एकदा यूपीएशी मतभेद
2011 मध्ये टीएमसीने ‘माँ, माटी, मानुष’चा नारा देत विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला. राज्यात 34 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीची धूळधाण उडाली आणि ममता राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
ममता यांच्या पक्षाने विधानसभेच्या 294 पैकी 184 जागा जिंकल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी स्थान मिळवल्यानंतर ममतांनी 18 सप्टेंबर 2012 रोजी यूपीएचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर नंदीग्राममध्ये हिंसाचाराची घटना घडली. सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) विकसित करण्यासाठी गावकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
माओवाद्यांच्या पाठिंब्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. गावकरी आणि पोलिस दलांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 14 जणांचा मृत्यू झाला. ममता यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृहमंत्री शिवराज पाटील यांना बंगालमधील सीपीएम समर्थकांच्या हिंसक कारवाया थांबवण्याबाबत पाऊल उचलण्यास सांगितलं. राज्य सरकारने हा प्रकल्प थांबवला तेव्हा हिंसक आंदोलनंही थांबली. मात्र, याच काळात ममतांच्या मनात असलेले केंद्र आणि काँग्रेसबाबतचे मतभेद आणखी वाढले.
लग्न का केलं नाही?
ममता बॅनर्जींनी लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा चर्चिला गेला आहे. स्वभावाने बंडखोर असलेल्या ममता सामाजिक परंपरांच्याही विरोधात आहेत. लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात होणारे बदल त्यांना मान्य नव्हते. त्यांनी आयुष्यभर समाजसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. समाजसेवेसाठी त्यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
आजही वडिलोपार्जित घरात राहतात
ममता यांचं वडिलोपार्जित घर दक्षिण कोलकाता येथील कालीघाट परिसरात आहे. या घराची अवस्था अत्यंत वाईट आहे. पावसाळ्याच्या दिवसात घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकदा पाणीदेखील तुंबतं. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अशा वेळी ममता रस्त्यावर लावलेल्या विटांवर पाय ठेवून घरात प्रवेश करतात. ममता केंद्रीय रेल्वे मंत्री होत्या तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या घरी गेले होते. घराची अवस्था पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं. अजूनही ममता याच घरात राहतात. त्यांचे सर्व विशेष पाहुणे याच घरी येतात.