सुप्रीम कमांडरचा अखेर अंत
छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर सुरक्षा दलांकडून काल रात्री मोठी कारवाई करण्यात आली. या चकमकीत सहा कोटी रुपये बक्षीस असलेला आणि अनेक हिंसक घटनांचा सूत्रधार असलेला माओवादी नेता मडावी हिडमा आणि त्याची पत्नी राजे हे दोघेही ठार झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मडावी हिडमा हा माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक एकचा सुप्रीम कमांडर होता, तसेच तो माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देखील होता.
advertisement
५०० जवानांच्या हत्येचा मास्टरमाईंड
दंडकारण्यासह संपूर्ण देशात झालेल्या माओवाद्यांच्या शेकडो हिंसक घटनांचा तो मुख्य सूत्रधार होता. हिडमावर सुमारे ५०० पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचे गुन्हे दाखल होते. विशेषतः, दंतेवाडा येथे एकाच घटनेत ८० जवान ठार झाले होते, त्या भीषण हल्ल्याचा मास्टरमाईंड हा होता. हिडमाच्या मृत्यूमुळे माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना मोठा धक्का बसला असून, सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. त्याच्या पत्नीलाही ठार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मडावी सुजाता हिडमाला शस्त्रे हाताळण्याचे आणि हल्ल्यांचे प्रशिक्षण देणारी होती. २०२४ मध्ये सुरक्षा दलांनी तिला तेलंगणा येथून अटक केली. तिच्या डोक्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. सुजाता बस्तर विभाग समितीची प्रमुख होती आणि सुकमासह अनेक भागात मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांच्या कटात तिचे नाव गुंतले आहे. तिने लहान वयातच हिंसाचार स्वीकारला आणि वीरप्पनप्रमाणेच ती लवकरच बस्तरच्या जंगलात भीतीचे प्रतीक बनली. लोक तिला "लेडी वीरप्पन" असेही म्हणत. सुजाताविरुद्ध अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल होते आणि सुरक्षा संस्था वर्षानुवर्षे तिचा शोध घेत होत्या. शिवाय, तिने विजापूर, सुकमा आणि दंतेवाडा येथील अनेक मोठ्या घटनांमध्ये भूमिका बजावली.
