पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल म्हणाले की, इस्लामाबादची ही चांगलीच परिचित कार्यपद्धती आहे की वारंवार भारतविरोधी भडकाऊ वक्तव्ये करणे. आम्ही पाकिस्तानच्या नेतृत्वाकडून भारताविरुद्ध सातत्याने येणाऱ्या बेजबाबदार, युद्धखोर आणि द्वेषपूर्ण टिप्पण्यांचे अहवाल पाहिले आहेत. भारताविरुद्ध भडकाऊ वक्तव्ये करून स्वतःच्या अपयशांवर पडदा टाकणे हे पाकिस्तानच्या नेतृत्वाचे चांगलेच परिचित धोरण आहे, असे त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.
advertisement
जायसवाल यांनी पुढे इशारा दिला की- इस्लामाबादने आपले वक्तव्य संयमित ठेवले पाहिजे. कारण कोणतीही चुकीची कारवाई झाली तर त्याचे परिणाम वेदनादायी असतील.
सिंधु जलसंधी अंतर्गत स्थापन झालेल्या मध्यस्थ न्यायाधिकरणाच्या निर्णयाबाबत विचारले असता जायसवाल म्हणाले की- त्यांचे निर्णय हे अधिकारक्षेत्राबाहेरचे असून, त्यांना कोणतेही कायदेशीर महत्त्व नाही. त्यांचा भारताच्या पाण्याच्या वापराच्या अधिकारांवर काहीही परिणाम होत नाही. पाकिस्तानने केलेले निवडक आणि दिशाभूल करणारे उल्लेख आम्ही पूर्णपणे फेटाळतो. भारत सरकारच्या सार्वभौम निर्णयानुसार सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जलसंधी निलंबित केल्यावर प्रतिक्रिया देताना, भारताला धमकी दिली होती.
मंगळवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शरीफ म्हणाले, शत्रूला मी आज सांगू इच्छितो की जर तुम्ही आमचे पाणी रोखण्याची धमकी दिलीत, तर लक्षात ठेवा—तुम्ही पाकिस्तानकडून एक थेंबही हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांनी इशारा दिली की भारताने प्रयत्न केला तर, तुम्हाला पुन्हा असा धडा शिकवला जाईल की तुम्ही कान धरत बसाल.
त्याआधीच्या दिवशी माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधु जलसंधीचे निलंबन हा सिंधू संस्कृतीवरील हल्ला असल्याचे म्हटले आणि जर पाकिस्तानला युद्धात ढकलले गेले तर देश मागे हटणार नाही, असा इशारा दिला.
यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी- भारताने जर पाणीपुरवठा बंद केला तर ते कोणतेही धरण उद्ध्वस्त करतील, असे सांगितल्याचे वृत्त आहे. आम्ही भारताने धरण बांधण्याची वाट पाहू आणि ते बांधले की आम्ही ते उद्ध्वस्त करू, असे त्यांचे वक्तव्य डॉन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले.
सिंधू नदी ही भारतीयांची कौटुंबिक मालमत्ता नाही. नदी थांबविण्याच्या भारतीय डावपेचांना हाणून पाडण्यासाठी आमच्याकडे साधनसंपत्तीची काहीही कमतरता नाही, असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताला धमकी दिली की पाकिस्तान हा प्रदेश अणुयुद्धात ढकलेल आणि जर नवी दिल्लीसोबतच्या भविष्यातील संघर्षात देशास अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर जगाचा जवळजवळ अर्धा भाग नष्ट करू शकतो.
अनेक प्रसंगी मुनीर यांनी पुरावा न देता अलीकडील तणावासाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध खालावले. नवी दिल्लीने अनेक दंडात्मक उपायांची घोषणा केली. ज्यामध्ये सिंधु जलसंधीचे निलंबन, इस्लामाबादमधील मिशनची ताकद कमी करणे आणि त्यांचे लष्करी अधिकारी हाकलून लावणे यांचा समावेश होता.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर नावाची कारवाई सुरू केली. या मोहिमेत नवी दिल्लीने अनेक हवाई तळांवर हल्ला करून पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर मोठा आघात केला. त्याचबरोबर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनाही प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. चार दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमावर्ती चकमकी झाल्या.