२१ व्या वर्षी देशासाठी बलिदान
हा व्हिडिओ सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शहीद जवान गुरनाम सिंह यांच्या आईचा आहे. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना गुरनाम सिंह यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. अवघ्या २१ व्या वर्षी भारतमातेच्या रक्षणासाठी ते शहीद झाले. त्यांच्या या शौर्याची आठवण म्हणून चंदीगडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
advertisement
मायेची शाल अन् ओलावलेले डोळे
सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच आपल्या मुलाला थंडी वाजत असेल, या भावनेने व्याकुळ झालेल्या आईने धावत जाऊन आपल्या शहीद मुलाच्या पुतळ्याला ब्लँकेट आणि शाल पांघरली. पुतळ्याचा चेहरा मायेने कुरवाळताना या माऊलीच्या चेहऱ्यावर जे भाव होते, ते कोणत्याही वीरगाथेपेक्षा मोठे होते. "माझा मुलगा शाहीद झाला तरी तो आजही माझ्यासाठी जिवंतच आहे, असं ही माऊली म्हणते.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी या माऊलीच्या प्रेमाला आणि शहीद जवानाच्या बलिदानाला सलाम केला आहे. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत "शहीद कधीच मरत नाहीत, ते आईच्या हृदयात कायम जिवंत असतात," अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
