४,९०० मीटर (१६,००० फूट) पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या भागात आता बर्फ हटवण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत सुमारे ३५० लोकांना वाचवण्यात आलं आहे. त्यांना कुदांग शहराच्या छोट्याशा गावात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार बर्फवृष्टी सुरू झाली. याचा सर्वाधिक फटका तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील उताराला बसला. याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली. हा सगळा परिसर गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेकजण या मार्गाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करत असतात.
advertisement
एका स्थानिक मार्गदर्शकाने सांगितलं की, "या वर्षीचं हवामान सामान्य नाही. ऑक्टोबरमध्ये कधीही अशा हवामानाचा सामना करावा लागत होता. पण आता अचानक हिमवादळ धडकल्याने सर्वजण अडकले आहेत."
तिबेटच्या ब्लू स्काय रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदतीसाठी फोन करण्यात आला होता. मुसळधार बर्फवृष्टीमुळे गिर्यारोहकांचे तंबू उघडून पडले असून काही गिर्यारोहकांना आधीच हायपोथर्मियाचा त्रास होत आहे. शेजारील नेपाळमध्ये देखील मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. यात किमान ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात आता माऊंट एव्हरेस्टवर हिमवादळ आल्याने जिवीतहानीचा धोका वाढला आहे.