JN.1 किती धोकादायक
कोविड-19चा हा नवीन सब-व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला हुलकावणी देण्यात पटाईत आहे. त्याची लक्षणं या पूर्वीच्या कोविड व्हेरियंट्ससारखीच आहेत. यामध्ये ताप येणं, सर्दी होणं, घसा खवखवणं, डोकेदुखी, पोटदुखी आणि जुलाब या लक्षणांचा समावेश आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या अधिक होऊ शकतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी सांगितलं की, JN.1 हा इतर प्रकारांपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. जरी हा सब-व्हेरियंट आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला मात देण्यास सक्षम असला तरी त्याची लागण झाल्यानंतर स्थिती अधिक गंभीर होण्याची किंवा रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची शक्यता खूप कमी आहे.
advertisement
सावध राहण्याचे आवाहन
तज्ज्ञांनी, JN.1 व्हेरियंटबाबत सतर्क आणि सावध राहण्यास सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणामुळे आपले शरीर विषाणूंच्या विविध व्हेरियंट्सशी लढण्यास सक्षम आहे. JN.1चा पहिला रुग्ण सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळला होता. 15 डिसेंबर रोजी चीनमध्ये याचे सात रुग्ण आढळले. त्यामुळे याच्या प्रसाराची चिंता वाढली. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी चेतावणी दिली की, कोविड -19 आणि इन्फ्लुएंझाची नवीन प्रकरणे यूएसमधील आरोग्य सेवा प्रणालीवर परिणाम करू शकतात. सीडीसीच्या ट्रॅकिंगवरून असं निदर्शनास आलं आहे की, कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
स्पाइक प्रोटीन करेल व्हायरसला मदत
भारतामध्ये, केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये 78 वर्षीय वृद्ध महिलेला सर्वांत अगोदर JN.1ची लागण झाली. JN.1 हा सब-व्हेरियंट ओमिक्रॉनच्या 'पिरोला' या व्हेरियंटपासून म्युटेट झाला आहे. यात स्पाइक प्रोटीन आहे. हा घटक व्यक्तीच्या शरीरात विषाणूची तीव्रता वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यास मदत करतो. स्पाइक प्रोटीन लोकांना संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. या कारणास्तव लसीचे डोस स्पाइक प्रोटीनला देखील टारगेट करण्याच्या उद्देशाने दिले जात आहेत.