नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात तपासात मोठी प्रगती झाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबीच्या साथीदाराला अटक केली असून, त्याचे नाव आमिर रशीद अली असे आहे. 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी रेड फोर्ट मेट्रो स्टेशनजवळ ह्युंदाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
advertisement
NIA ने तपासानंतर सांगितले की, आरोपी आमिर हा जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथील रहिवासी असून त्याने आत्मघाती हल्लेखोर उमर नबी याच्यासोबत मिळून हा हल्ला रचला. स्फोटासाठी वापरलेली कार आमिरच्या नावावर नोंदणीकृत होती आणि कार खरेदी करण्यासाठी तो स्वतः दिल्लीला आला होता. हीच कार नंतर IED (Improvised Explosive Device) ने भरून उडवण्यात आली. तपासातून हेही पुष्टीस आले की कार चालवत असलेला आणि स्फोटात ठार झालेला व्यक्ती म्हणजेच डॉ. उमर नबी फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील जनरल मेडिसिन विभागात कार्यरत असलेला असिस्टंट प्रोफेसर.
NIA ने आमिरच्या पंपोरमधील घरावर एकापेक्षा जास्त छापे टाकले असून त्याचा भाऊ सध्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास यंत्रणांनी उमर नबीच्या मालकीची आणखी एक कार जप्त केली असून त्यामध्ये पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणातील 73 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे, ज्यात जखमींचाही समावेश आहे.
NIA दिल्ली पोलिस, जम्मू-काश्मीर पोलिस, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि केंद्रातील विविध सुरक्षा संस्थांशी समन्वय साधून व्यापक षड्यंत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून 9 मिमीच्या तीन काडतुसे आढळली आहेत. त्यापैकी दोन जिवंत तर एक रिकामा शेल होता. ही काडतुसे नागरीकांसाठी प्रतिबंधित असून सामान्यतः सुरक्षा दलांकडे किंवा विशेष परवानाधारकांकडेच असतात. घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची शस्त्रं तपासल्यानंतर त्यांची कोणतीही काडतूस कमी नसल्याचे स्पष्ट झाल्याने या काडतुसांचा उगम काय आणि ते तिथे कसे आले, याचा शोध घेतला जात आहे.
स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी मध्य दिल्लीतील सुरक्षा मोठ्या प्रमाणावर कडक केली असून महत्त्वाच्या ठिकाणांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीच्या विशेष ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 34 सोडून दिलेली वाहने जप्त केली आणि पाच तास चाललेल्या मोहिमेत 417 चालानही काढले. अधिकाऱ्यांनी सांगितले की राजधानीत सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या असून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे.
