नेमकं प्रकरण काय?
बिहारमध्ये नुकताच सरकारी डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्र देताना नुसरत परवीन यांचा हिजाब ओढला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी टीका झाली होती. या घटनेमुळे नुसरत परवीन यांना स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटत असून त्या मानसिक धक्क्यात आहेत.
advertisement
कुटुंबाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू
नुसरत यांचं कुटुंब सध्या कोलकात्यात वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "आम्ही नुसरतची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत. यात तिची काहीही चूक नाही, त्यामुळे सरकारी नोकरी सोडणे योग्य नाही. मात्र, ती बिहारमध्ये काम न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे." नुसरत यांचा भाऊ कोलकात्यातील एका सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, मात्र त्यांनी या संवेदनशील विषयावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
२० डिसेंबरला रुजू होणे होते अपेक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत परवीन यांना २० डिसेंबर रोजी आरोग्य विभागात रुजू व्हायचं होतं. मात्र, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्या पाटण्याहून कोलकात्याला परतल्या. त्या आता पुन्हा बिहारला जाण्यास नकार देत आहेत.
'मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, पण अपमान वाटला'
नुसरत यांचा शेजारी मोहम्मद अशफाक याने सांगितले की, या घटनेनंतर नुसरतने रडत रडत आपल्या भावाशी फोनवर संवाद साधला होता. "मी या गोष्टीसाठी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, पण त्या सार्वजनिक ठिकाणी जो प्रकार घडला, त्याने मला अपमानित झाल्यासारखं वाटलं," अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या. या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद निर्माण केला असून, एक गुणवंत डॉक्टर केवळ अपमानित झाल्याच्या भावनेतून सरकारी नोकरी सोडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
