संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी 'ऑपरेशन सिंदूर', बिहारमधील मतदारयादी पुनरावलोकन, तसेच भारत-पाक संघर्षावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली. सरकारने मात्र सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्टपणे सांगितले की, “संसद नियम आणि परंपरांच्या चौकटीत राहून सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. विरोधी पक्षांनीही सहकार्य करावं, हीच अपेक्षा असल्याचे रिजीजू यांनी सांगितले. 'ऑपरेशन सिंदूर'वर विरोधकांसह भाजपच्या मित्रपक्षांना संसदेत चर्चा हवी आहे.
advertisement
अधिवेशनात चर्चेचे मुख्य मुद्दे म्हणून 'ऑपरेशन सिंदूर', ट्रम्प टॅरिफ प्रकरण, बेरोजगारी, महागाई, शेतकरी समस्या आणि सामाजिक न्याय यांचा समावेश होणार आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत संसदेत जोरदार घमासान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री व राज्यसभेतील नेते जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले.
या बैठकीत मंत्री रिजीजू आणि अर्जुन राम मेघवाल यांनी सरकारचे प्रतिनिधीत्व केले. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 17 महत्वाची विधेयक मांडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचं मुख्य लक्ष्य हे आयकर विधेयक संमत करण्यावर असणार आहे. हे विधेयक 13 फेब्रुवारीला मांडण्यात आलं होतं. विरोधकांनी सरकारला 8 मुद्द्यांवर चर्चेती मागणी केली.
