चेन्नई: तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात अभिनेता ते नेते बनलेले विजय यांच्या भव्य सभेत भीषण चेंगराचेंगरी झाली. यात किमान 36 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सहा मुले आणि 16 महिला यांचा समावेश आहे. याशिवाय 58 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले: तमिळनाडूच्या करूर येथे झालेल्या राजकीय सभेत घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना बळ मिळो हीच प्रार्थना. जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
रजनीकांत यांचे मन हेलावून गेले
अभिनेते रजनीकांत यांनीही या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले: करूरमध्ये घडलेल्या दुर्घटनेत निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी दिलासा मिळावा ही प्रार्थना.
विजय यांच्या सभेत गोंधळ
ही दुर्घटना तेव्हा घडली जेव्हा तमिळगा वेत्री कळगम (TVK) प्रमुख विजय यांच्या सभेसाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गर्दी पुढे ढकलली गेल्याने अनेकांना श्वास घेणं अवघड झालं आणि लोक कोसळू लागले. विजय यांनी तात्काळ आपलं भाषण थांबवत पोलिसांना मदतीसाठी हाक दिली.
सभेत अनेक जण बेशुद्ध पडले तेव्हा विजय स्वतः लोकांमध्ये पाणी बाटल्या वाटत होते आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करत होते. मात्र प्रयत्नांनंतरही परिस्थिती लवकरच बिघडली आणि चेंगराचेंगरीने जीवघेणं रूप धारण केलं. PTIने शेअर केलेल्या व्हिडिओत विजय भाषण थांबवून लोकांना मदत करताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे आदेश
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेला हृदय पिळवटून टाकणारी अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी तातडीने मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय पथके करूरला रवाना करण्याचे आदेश दिले आहेत.
स्टॅलिन म्हणाले: रुग्णालयात दाखल झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आदेश दिले आहेत. आवश्यक ती मदत युद्धपातळीवर करण्यात यावी, यासाठी तिरुचिरापल्ली आणि सालेम येथून अतिरिक्त डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले की, या बचाव आणि मदतकार्यांत गुंतलेल्या डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करावे.
अधिकाऱ्यांनी सांगितले केली की- 33 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत झालेल्या चुकांवर चौकशी केली जाईल.