नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अचानकपणे देशाला संबोधित करणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेने एचवन1बी व्हिसाबाबत घेतलेला निर्णय, जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी आणि मागील काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीच्या मुद्यावर दिलेला भर, यामुळे आज ते कोणता निर्णय जाहीर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement
पंतप्रधान मोदी यांनी याआधी देखील अचानकपणे देशाला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे देशवासियांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. सोमवार, 22 सप्टेंबरपासून देशात जीएसटी 2.0 नुसार नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे पीएम मोदी हे जीएसटी दरांमधील बदल आणि "व्होकल फॉर लोकल" मोहिमेवर भाष्य करतील अशी अपेक्षा आहे. तथापि, ते अमेरिकेतील व्यापार युद्ध आणि एच1बी व्हिसाशी संबंधित वादावर चर्चा करतील की नाही याबद्दल कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन सरकारसोबतचे मुद्दे हे अत्यंत संवेदनशील आणि खोलवरचे राजनैतिक मुद्दे आहेत. ते राजनैतिक पद्धतीने सोडवले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करताना कोणत्या मुद्यावर बोलतील हे अद्याप अचूकपणे सांगणे शक्य नसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. मात्र, पीएम मोदी हे जीएसटी मुद्द्यावर भाषण करतील आणि लोकांना फक्त देशांतर्गत उत्पादित वस्तू खरेदी करण्यास आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यास सांगतील असे म्हटले जात आहे.
अमेरिकेच्या मुद्यावर भाष्य?
सध्याच्या परिस्थितीत सर्वांचे लक्ष अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर असल्याने पंतप्रधानांच्या भाषणाबाबत अनेक अटकळ बांधली जात आहेत. रशियाकडून तेल आयात करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या H1B व्हिसा कार्यक्रमात एक मोठा बदल केला, H1B व्हिसा शुल्क $100,000 अथवा अंदाजे 88 लाख रुपयापर्यंत वाढवले. भारतासाठी हे एक मोठे आव्हान म्हणून पाहिले जात आहे. भारत हा अमेरिकेच्या H1B व्हिसाचा सर्वात मोठा लाभार्थी आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गोंधळ उडाला आहे. मात्र, पंतप्रधान मोदी या संवेदनशील मुद्द्यावर सार्वजनिकरित्या चर्चा करतील अशी शक्यता कमी आहे.