अयोध्या, 25 डिसेंबर : भगवान राम नगरी अयोध्येसाठी एक नवा इतिहास लिहिला जात आहे. धर्मनगरी आणि पुरातन वारसा लाभलेली अयोध्या दिवसेंदिवस उत्साह दिसत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येला भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी यजमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
advertisement
आता देशातील पहिली अमृत भारत ट्रेन अयोध्येतून धावणार आहे. या अमृत भारत ट्रेनचे उद्घाटन 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचतील आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरून अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावताना दिसणार आहे. या ट्रेनमध्ये 22 बोगी असतील. यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे. इतकेच नाही तर ही ट्रेन प्रभू रामाच्या शहराला माता सीतेच्या जन्मस्थानाशी जोडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृत भारत ट्रेन पूर्णपणे स्वदेशी आहे. ही ट्रेन अगदी वंदे भारतासारखी आहे. यामध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा झटका बसणार नाही. हायटेक टॉयलेट, मोबाईल चार्जिंग, ऑटोमॅटिक दरवाजे आणि अत्याधुनिक खिडक्या आणि दरवाजे ही या अमृत भारत ट्रेनची खासियत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरून अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर ज्या ज्या स्थानकावर ही थांबेल तिथे या ट्रेनचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्या जिल्ह्याचे अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या अमृत भारत रेल्वेचे भव्य स्वागत करतील.