नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडगोळीवर बिहारच्या जनतेने पुन्हा विश्वास दाखवून एनडीएच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागी एनडीएचे उमेदवार जिंकले. महागठबंधनला केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. बिहारमध्ये एनडीएला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाषण केले. भाषणात त्यांनी राजद आणि काँग्रेसवर सडकून प्रहार केले.
advertisement
काँग्रेसचा एक गट अस्वस्थ, पक्षाचे तुकडे होतील
सातत्याने संविधानिक संस्थांवर अविश्वास दाखवून लोकांमध्ये संशय निर्माण करण्याचे काम त्यांचे नेतृत्व करीत आहेत. कारण काँग्रेसकडे लोकांसाठी काम करण्याची कोणतीही दूरदृष्टी नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणापायी काँग्रेस आता मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस झाली आहे, असा हल्लाबोल करीत राहुल गांधी यांचा उल्लेख त्यांनी काँग्रेसचे नामदार असा केला. नामदारांच्या भूमिकेमुळे पक्षातील लोक अस्वस्थ आहेत. काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष असून पक्षाचे तुकडे होऊ शकतात, असे मोदी म्हणाले.
मुस्लिम-यादव फॉर्म्युल्यावर सडकून टीका
छठपूजेला ड्रामा म्हणणाऱ्यांना बिहारी जनतेने घरी बसवले. जामिनावरील लोकांना साथ देणार नाही हे बिहारच्या जनतेने दाखवून दिले. काहींनी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी MY अर्थात मुस्लिम-यादव अशा फॉर्म्युल्याची घोषणा दिली. पण एनडीएच्या विजयाने MY अर्थात महिला, यूथ समीकरण अधोरेखित झाले, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला.
बिहारमध्ये गुलाल उधळला, बंगाल आता दूर नाही
दिल्लीत ३० वर्षांनंतर आपण जिंकलो, महाराष्ट्रात सलग दिसऱ्यांदा आपण विजय मिळवला. हरियाणात पुन्हा सत्ता मिळवली. आज बिहारमध्ये जनतेने आपल्याला साथ दिली. बिहारच्या विजयाने बंगालच्या विजयाचा रस्ता खुला झाला आहे. बंगालमधले जंगलराज संपविण्याची वेळ आली आहे , असे सांगत मोदींनी ममता बॅनर्जी यांना खुले आव्हान दिले.
