जुनागढ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतावेळी कथितपणे पाकिस्तानी गाणे वाजवण्यात आल्याने शुक्रवारी मोठे वादळ उठले. यामुळे गुजरातचे राजकारण चांगलेच तापले. भाजपने याला केवळ गुजरातचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान ठरवले.
राहुल गांधी हे केशोद विमानतळावर उतरले आणि जूनागढ येथे पोहोचले. येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. याचदरम्यान भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करून आरोप केला की राहुल गांधींच्या स्वागतासाठी पाकिस्तानी गाणे वाजवले गेले. त्यांनी लिहिले – लज्जास्पद! आपल्या जवानांचा पाकिस्तानशी सीमेवर लढा सुरू असताना काँग्रेसचे समर्थक आपल्या नेत्यासाठी पाकिस्तानी गाण्यवर थिरकत आहेत. हा गुजरात आणि भारत दोघांचाही अपमान आहे.
advertisement
भाजप नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. पक्षाचे म्हणणे आहे की, राहुल गांधींसाठी भारतापेक्षा पाकिस्तान प्रिय आहे आणि हेच काँग्रेसची खरी विचारसरणी दाखवते.
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दरम्यान राहुल गांधींनी आपल्या दौर्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर भेटीवर टीका केली. ते म्हणाले, मणिपूर बराच काळ संकटातून जात आहे आणि पंतप्रधान आता तेथे जाण्याचा निर्णय घेत आहेत, यात काही मोठे नाही. खरी समस्या म्हणजे मतचोरी आहे. सर्वत्र लोक ‘वोट चोर’ अशी घोषणाबाजी करत आहेत.
राहुल गांधींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे.जेव्हा पंतप्रधान मोदी शनिवारी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत आणि हिंसाग्रस्त भागातील विस्थापितांशी भेट घेणार आहेत.
भाजपचा तातडीचा पलटवार
भाजपने राहुल गांधींच्या आरोपांना त्वरित फेटाळून लावले. पक्षाचे नेते जी. व्ही. एल. नरसिंहा राव यांनी आकडेवारी देत सांगितले की काँग्रेसचा ऱ्हास 1984 पासूनच सुरू आहे. राजीव गांधींच्या काळात 414 जागा जिंकणारी काँग्रेस 2014 मध्ये घटून फक्त 44 जागांवर आली. याला जबाबदार कोण? राहुल गांधी प्रत्येक त्या प्रादेशिक नेत्याला ‘वोट चोर’ म्हणणार का ज्यांनी काँग्रेसचा पराभव केला?
राव यांनी उपरोधिक प्रश्न केला की, राहुल गांधींच्या नजरेत व्ही. पी. सिंह, मुलायम सिंह, मायावती, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद आणि शरद पवार हे देखील मतचोर आहेत का? या संपूर्ण वादामुळे गुजरातचे राजकारण तापले असून राहुल गांधी आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.