'उत्तम युद्धनौकेची निर्मिती हे आत्मनिर्भर भारत आणि देशाची तंत्रज्ञानातील प्रगती या दोन्हींचं उदाहरण आहे. या वेळी उपस्थित राहत असल्याचा मला आनंद आहे. भारताची सागरी क्षेत्रातली क्षमता वाढत असल्याचं यातून दिसत आहे. त्या दिशेने पुढे टाकलेलं पाऊल आहे,' असं मुर्मू यांनी सांगितलं.
'ज्या प्रोजेक्ट '17 ए'चा विंध्यगिरी ही भाग आहे, तो प्रोजेक्ट आपलं स्वयंपूर्णतेप्रति आणि तांत्रिक प्रगतीविषयी असलेली कटिबद्धता दर्शवतो. स्वदेशी इनोव्हेशन वापरून उत्तम तंत्रज्ञानाची निर्मिती यातून केलेली आहे. आपल्या सागरी क्षेत्रात असलेल्या सर्व प्रकारच्या आव्हानांना या सीरिजमधल्या सर्व युद्धनौका सक्षमपणे तोंड देऊ शकतील, अशी माहिती मला देण्यात आली आहे,' असं मुर्मू यांनी सांगितलं.
advertisement
विंध्यगिरीसारख्या युद्धनौकांसह 100हून अधिक नौकांची बांधणी करण्यात योगदान असलेल्या, तसंच नौदलातल्या सर्वांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं. 'तुम्हा सर्वांची कौशल्यं आणि अथक परिश्रम यांतून आपण हा मैलाचा दगड गाठू शकलो आहोत. त्यामुळे मी सगळ्या टीमचं अभिनंदन करते,' असं त्यांनी सांगितलं.
'हिंदी महासागराचा प्रदेश, तसंच मोठ्या इंडो-पॅसिफिक प्रदेशातल्या सुरक्षिततेचे अनेक पैलू आहेत. त्यात चाचेगिरी, सशस्त्र दरोडे, ड्रग स्मगलिंग, बेकायदा मानवी स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती आणि अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदल भारताच्या सागरी क्षेत्राचं संरक्षण, संवर्धन करत आहे. सुरक्षेशी निगडित आव्हानांशी दोन हात करताना नौदलाची भूमिका कायमच महत्त्वाची राहिलेली आहे,' असं मुर्मू म्हणाल्या.
आयएनएस विंध्यगिरी आणि तिच्या उद्घाटनासंदर्भातले काही मुद्दे
- 'विंध्य पर्वतरांगा हे धैर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे विंध्यगिरी हे या युद्धनौकेला दिलेलं नाव चपखल आहे. या युद्धनौकेचं जलावतरण होईल, तेव्हा ती विंध्य पर्वताचा मजबूतपणा दाखवील,' असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
- नौदलासाठीच्या 'प्रोजेक्ट 17 अल्फा'मधल्या सातपैकी विंध्यगिरी ही पूर्ण झालेली सहावी युद्धनौका आहे. 2019 ते 2022 या कालावधीत आधीच्या पाच नौका दाखल करण्यात आल्या.
- कोलकात्यातल्या शिपयार्डमध्ये नौदलासाठी या प्रोजेक्टअंतर्गत बांधली जात असलेली ही तिसरी आणि अंतिम युद्धनौका आहे.
- या प्रोजेक्टमधल्या नौका आणि युद्धनौकांच्या बांधणीसाठी 75 टक्के उपकरणं आणि यंत्रणा स्वदेशी असून, त्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांकडून घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात सक्रियपणे दाखल होण्यापूर्वी आयएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेवर अत्यंत उत्तम प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येईल आणि त्याच्या खूप कठोर चाचण्याही घेतल्या जातील.
- 149 मीटर लांब आणि सुमारे 6670 टन वजन असलेल्या या नौकेचा कमाल वेग 28 नॉट्स आहे. त्यावर गायडेड मिसाइल्स आहेत. हवेतून, जमिनीवरून किंवा सब-सरफेस प्रकारच्या हल्ल्यालाही ही नौका परतवून लावू शकते, असं GRSEच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
'कोलकात्याचं स्थान असं आहे, की जे नौदलाच्या दृष्टीने अत्यंत तयारीत राहण्याकरिता महत्त्वाचं आहे. प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी आणि आपल्या सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे,' असंही मुर्मू म्हणाल्या. राष्ट्रपती झाल्यानंतर मुर्मू यांचा हा दुसरा पश्चिम बंगाल दौरा आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वेळी उपस्थित होत्या.