पंतप्रधान मोदींनी 60 वर्षांची गोष्टी मांडत म्हटले, "लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई…" ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्या चुका झाल्या, त्याची शिक्षा आजपर्यंत देश भोगतोय.
अक्साई चिनबाबत बोलताना मोदी म्हणाले की- तो संपूर्ण भाग नापीक जमीन म्हणून घोषित करण्यात आला आणि त्याचमुळे देशाला तब्बल 38,000 चौरस किलोमीटर भूभाग गमवावा लागला.
advertisement
माझ्या काही गोष्टी टोचतील
मोदी पुढे म्हणाले- 1962 आणि 1963 दरम्यान काँग्रेसचे नेते जम्मू-काश्मीरमधील पुंछ, उरी, नीलम व्हॅली आणि किशनगंगा हे भाग सोडण्याचा प्रस्ताव ठेवत होते. तेही "लाइन ऑफ पीस"च्या नावाखाली. 1966 मध्ये रण ऑफ कच्छवर मध्यस्थता स्वीकारून काँग्रेस सरकारने पुन्हा एकदा भारताचा 800 चौरस किमी भूभाग पाकिस्तानला देऊन टाकला.
1965 च्या युद्धात भारतीय सेनेने हाजी पीर पास परत जिंकला होता. परंतु काँग्रेसने तो पुन्हा पाकिस्तानला परत दिला. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचे 93,000 सैनिक भारताच्या ताब्यात होते. हजारो चौरस किलोमीटर पाकिस्तानचा भूभाग भारताच्या नियंत्रणात होता. तेव्हा जर थोडा दृष्टीकोन असता, थोडेसे नियोजन असते तर पीओके पुन्हा भारतात सामील करण्याचा निर्णय घेता आला असता. तो ऐतिहासिक क्षणही वाया गेला. एवढं काही टेबलवर होतं, तरी कमीत कमी करतारपूर साहिब तरी भारतात आणता आला असता.
1974 मध्ये श्रीलंकेला कच्चतीवू बेट गिफ्ट करून टाकले. त्यामुळे आजही भारतीय मच्छीमारांचे जीव धोक्यात येतात.
मोदी म्हणाले, काँग्रेस अनेक दशकांपासून सियाचीनमधून भारतीय सैन्य हटवण्याच्या विचारात होती. जर 2014 मध्ये देशाने त्यांना पुन्हा संधी दिली असती, तर आज सियाचीन आपल्याकडे राहिला नसता. आज जे लोक आम्हाला डिप्लोमसी शिकवतात, त्यांना मी काही गोष्टी आठवण करून देऊ इच्छितो.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम थांबले नाही. परदेशी दबावाखाली त्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांतच काँग्रेस सरकारने पाकिस्तानशी पुन्हा संवाद सुरू केला. त्या सरकारने एका पाकिस्तानी मुत्सद्दीलाही देशाबाहेर हाकलण्याची हिंमत दाखवली नाही. एकही व्हिसा रद्द केला नाही. देशावर पाकिस्तान प्रायोजित मोठाले हल्ले होत राहिले, पण यूपीए सरकार पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देत राहिली, असे मोदी म्हणाले.
देश मुंबई हल्ल्याचा न्याय मागत होता आणि काँग्रेस पाकिस्तानसोबत व्यापार करायला उत्सुक होती. ज्या पाकिस्तानी भूमीतून रक्ताची होळी खेळली जात होती. त्या वेळी भारतात काँग्रेस ‘अमन की आशा’चे मुशायरे आयोजित करत होती असे सांगत मोदी म्हणाले की- आम्ही हा वनवे ट्रॅफिक बंद केला!
