उज्ज्वल निकम यांच्याव्यतिरिक्त, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या सदानंदन मास्टर यांनाही राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती वरिष्ठ सभागृहासाठी नामांकित करू शकतात. भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 80 अंतर्गत ही नियुक्ती केली आहे.
उज्जवल निकम:
advertisement
महत्त्वाच्या आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून आपली छाप पाडणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उज्वल निकम यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारीही मिळवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे.
हर्ष श्रृंगला :
माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. 1984च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असलेले श्रृंगला हे बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त होते. ते जानेवारी 2020 ते एप्रिल 2022 पर्यंत परराष्ट्र सचिव होते. हर्षवर्धन श्रृंगला हे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त भारतीय राजदूत आहेत ज्यांनी 2023 मध्ये भारताच्या जी-20 अध्यक्षपदासाठी मुख्य समन्वयक म्हणून काम केले होते. त्यांनी यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव, अमेरिकेत भारताचे राजदूत, बांगलादेशात उच्चायुक्त आणि थायलंडमध्ये राजदूत म्हणून काम केले आहे.
मीनाक्षी जैन
मीनाक्षी जैन या एक भारतीय इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत. मध्ययुगीन आणि वसाहतवादी भारतावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी काही पुस्तकांचे लेखन केले आहे. 'फ्लाइट ऑफ डेइटीज अँड रिबर्थ ऑफ टेम्पल्स' आणि 'द बॅटल फॉर राम: केस ऑफ द टेम्पल अॅट अयोध्या' यांचा समावेश आहे. साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी त्यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीनाक्षी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
सदानंदन मास्टर...
केरळ भाजप सदस्य आणि शिक्षक सी. सदानंदन मास्टर यांना 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली होती. सदानंदन यांना त्यांच्या परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जाते. आगामी केरळ विधानसभेच्या निवडणुका पाहता सदानंदन मास्टर यांची खासदारकी भाजपसाठी किती फायदेशीर ठरेल, याची चर्चा सुरू झाली आहे.