मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् आता लग्नाच्या गाठी
रेहान आणि अवीवा यांची मैत्री गेल्या सात वर्षांपासूनची आहे. दिल्लीत राहणारी अवीवा आणि रेहान यांच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे 'कला'. अवीवा बेग स्वतः एक उत्तम फोटोग्राफर असून रेहान यांचीही फोटोग्राफी आणि व्हिज्युअल आर्टमध्ये विशेष रुची आहे. विचारांची हीच नाळ जुळल्याने दोघांनी आता आयुष्यभर एकत्र चालण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
रणथंभौरच्या मातीत रंगणार शाही विवाह?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील रणथंभौरमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधी स्वतः आपल्या कुटुंबासह रणथंभौरमधील हॉटेल शेरबागमध्ये पोहोचल्या असून लग्नाच्या तयारीसाठीच हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. प्रियांका गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला रणथंभौरचे निसर्गसौंदर्य नेहमीच भावते, त्यामुळे लेकाच्या लग्नासाठीही याच ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.
कोण आहे रेहान वाड्रा?
राजकीय वारसा असूनही २४ वर्षीय रेहान यांनी अद्याप राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्यांचा कल राजकारणापेक्षा कलेकडे अधिक आहे. रेहान हे एक 'विजुअल आर्टिस्ट' म्हणून ओळखले जातात. त्यांनी लंडनच्या नामांकित विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असून, 'डार्क परसेप्शन' या नावाने त्यांचे सोलो आर्ट एक्झिबिशनही खूप गाजले आहे. निसर्ग आणि ट्रॅव्हल फोटोग्राफीची त्यांना प्रचंड आवड असून सोशल मीडियावरही ते त्यांच्या कलेचे दर्शन घडवत असतात.
वाड्रा घराण्याची होणारी सून 'अवीवा'
अवीवा बेग या दिल्लीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील असून त्या व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. रेहान आणि अवीवा या दोघांचे छंद आणि करिअरची क्षेत्रे सारखीच असल्याने त्यांची जोडी सोशल मीडियावरही चर्चेत आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ मैत्रीनंतर आता हे दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. सध्या तरी लग्नाची नेमकी तारीख गुलदस्त्यात असली, तरी प्रियांका गांधींचे संपूर्ण कुटुंब सध्या राजस्थानमध्ये असल्याने लवकरच या शाही विवाहाचे फोटो समोर येतील, अशी आशा चाहत्यांना लागली आहे.
