'मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सरसंघचालकांनी हे वक्तव्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रसिद्धी पराडमुखपणे कार्य करून पंच्याहत्तरीनंतर निवृत्त होण्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले. संघाचे बौद्धिक प्रमुख राहिलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आठवणींना सरसंघचालकांनी उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरी निमित्त तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून सत्कार केला. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, 'पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे, असे मोरोपंत यांनी म्हटले असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.
advertisement
कधीही पुढे-पुढे केलं नाही....
मोरोपंत पिंगळे यांच्याबाबत बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, राम जन्मभूमी आंदोलनातही मोरोपंतांनी अशोक सिंघल यांनाच समोर ठेवले. स्वतः कधीही पुढे-पुढे केले नाही. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून कार्य करण्याचा वस्तूपाठ त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला होता. अमुक एक गोष्ट मीच करील अशी भावना त्यांच्या मानात नव्हती, त्यांनी डोंगरा एवढा कार्य संघाला समर्पित केले असल्याचे ही सरसंघचालकांनी म्हटले.
संजय राऊत म्हणतात, मोदींना हा सल्ला...
सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींना उद्देशून होते, असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनीच भाजपात वयाच्या 75 वर्षानंतरच्या निवृत्तीचा नियम लागू केला आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले. आता, येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी हे वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.