काय आहे ताजं अपडेट?
राज्य सरकारच्या वतीने दाखल केलेल्या या लीव टू अपील याचिकेवर उद्या (28 जुलै 2025) राजस्थान उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मनोज गर्ग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या याचिकेला न्यायालयाच्या मुख्य प्रकरण यादीत क्रमांक 60 वर स्थान देण्यात आले आहे.
ट्रायल कोर्टाने ज्यांना निर्दोष ठरवले त्या सह-आरोपींविरोधात पुरेसे साक्षीपुरावे होते. त्यांना दोषमुक्त करणे योग्य नव्हते. त्यामुळे सरकारने उच्च न्यायालयाकडे विनंती केली आहे की त्यांनी या निर्णयाची समीक्षा करावी आणि या सह-आरोपींविरुद्ध पुन्हा अपील करण्याची परवानगी द्यावी, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला आहे.
advertisement
Leave to Appeal म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या प्रकरणात खालच्या न्यायालयाने निर्णय दिला असतो आणि त्या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात अपील करता येत नाही. तेव्हा ‘लीव टू अपील’ म्हणजे ‘अपीलसाठी परवानगी’ मागितली जाते. जर न्यायालयाला वाटले की प्रकरण गंभीर आहे किंवा त्याचा पुन्हा विचार होणे आवश्यक आहे, तर ते अशा अपीलला सुनावणीस परवानगी देते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काळवीट शिकार प्रकरण हे 1998 मधील आहे. या प्रकरणात सलमान खान आणि त्याचे सहकारी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आणि दुष्यंत सिंह यांच्यावर आरोप करण्यात आला होता की- त्यांनी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळ्या हरिणाची बेकायदेशीर शिकार केली.
या प्रकरणात सलमान खानला शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र इतर सर्व सह-आरोपींना कोर्टाने दोषमुक्त केले होते. राज्य सरकारचा युक्तिवाद आहे की या इतर कलाकारांवरही पुरेसे पुरावे होते आणि त्यांच्याविरुद्ध पुन्हा सुनावणी व्हावी, यासाठी आता त्यांनी उच्च न्यायालयात ‘लीव टू अपील’ दाखल केली आहे.
