सत्यपाल मलिक यांना मे 2025 पासून दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे आणि मूत्रपिंड निकामी होण्याच्या गुंतागुंतीमुळे आयसीयूमध्ये ठेवण्यात होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास रुग्णालयाने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
advertisement
कलम 370 रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे संविधानातील 'कलम 370' केंद्र सरकारने रद्द केले होते. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. मलिक राज्यपाल असताना पीडीपी आणि भाजप आघाडीची काश्मीरमध्ये सत्ता होती. भाजपने सत्तेबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तेची गणित जुळवण्यास सुरुवात झाली. मात्र, सत्तेचा दावा करण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी पीडीपीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. हा दावा फॅक्सने करण्यात आला होता. मात्र, राजभवनातील मशीन बंद असल्याच्या कारणाने हा दावा पोहचला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली. त्यानंतर मोठ्या घडामोडी झाल्या आणि कलम 370 हटवण्यात आले.
2019 च्या पुलवामा हल्ल्यातील सुरक्षेतील त्रुटी आणि जम्मू-काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर उघडपणे त्यांनी भाष्य केले. त्यानंतर ते भाजपचे प्रमुख टीकाकार झाले होते. मलिक हे जम्मू-काश्मीरनंतर बिहार आणि मेघालयाचेही राज्यपाल होते.
कोण होते सत्यपाल मलिक?
सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी झाला. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावचे होते. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी 1968-69 मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते 1974-77 पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि 1980 ते 1989 पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. 1989 ते 1991 पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते.
