रेल भवनच्या बाजूने एका झाडावरून भिंतीवरून उडी मारून एक अज्ञात व्यक्ती संसद भवन परिसरात पोहोचला. त्यानंतर तो गरुड गेटवर दाखल झाला होता. ही घटना आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काही दिवसांपूर्वी संसद भवनाची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्यात आली होती. संसद भवन ही एक अतिशय महत्त्वाची इमारत असल्याने, सुरक्षा दल त्याच्या प्रत्येक इंचावर बारकाईने लक्ष ठेवतात. परंतु पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचे उल्लंघन झाले आहे.
advertisement
अटक केलेल्या आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशचा असून त्याचे नाव रामा आहे. तो 20 वर्षांचा असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली आहे. अधिवेशन संपल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा आज वावर कमी होता. झाडाच्या साहाय्याने आरोपी भिंतीवर चढला आणि नंतर संसद भवनाच्या आवारात उडी मारली. या व्यक्तीने रेल भवनच्या बाजूने शिरकाव केला. यानंतर तो नवीन संसद भवनाच्या गरुड गेटवर पोहोचला.
संसदेच्या सुरक्षे व्यवस्थेवर मोठे प्रश्न?
संसदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्यक्षात नवीन संसदेची भिंत सुमारे 20 मीटर उंच आहे. प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. या जवानांवर सभोवताली देखरेख करण्याशिवाय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यानंतरही तो माणूस झाडावर चढला. एवढेच नाही तर चढल्यानंतर त्याने 20 मीटर उंच भिंतीवरून खाली उडी मारली. तिथून तो 15 मीटर अंतरावर असलेल्या गरुड द्वार येथे पोहोचला.
लोकसभेत आधीही तरुणांनी केला होती शिरकाव
2023 मध्येही संसद हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली. संसदेत सुरू असलेल्या कामकाजादरम्यान सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे दोन तरुण लोकसभा सभागृहात घुसले. संसदेच्या अभ्यागतांच्या गॅलरीतून उडी मारून या लोकांनी लोकसभा सभागृहात स्मोक स्टिक फोडली. मात्र, सभागृहात उपस्थित असलेल्या काही खासदारांनी दोघांनाही पकडले. त्याच वेळी नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनीही संसदेबाहेर स्मोक स्टिक फोडत घोषणाबाजी केली.
या प्रकरणात एकूण 6 जणांना अटक करण्यात आली होती. इतर दोन आरोपींमध्ये महेश कुमावत आणि ललित झा यांचा समावेश आहे. ललित झा हा संपूर्ण घटनेचा सूत्रधार मानला जातो. सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात 900 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
