ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहाराच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीमध्ये पहाटे ४ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना मनोज पुगालिया यांच्या निवासस्थानी घडली. रात्री उशिरा त्यांनी आपली इलेक्ट्रिक कार घराबाहेर चार्जिंगसाठी लावली होती. पहाटे ४ च्या सुमारास चार्जिंग पॉईंटवर अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि कारने पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळातच आगीने घराला आपल्या विळख्यात घेतलं.
advertisement
सिलेंडरचे स्फोट
आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत ज्वाळा पोहोचल्या. यामुळे एकापाठोपाठ एक अशा १० हून अधिक सिलिंडर्सचे भीषण स्फोट झाले. स्फोटांची तीव्रता इतकी प्रचंड होती की घराचा काही भाग कोसळला. पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पुगालिया यांचा पॉलिमरचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने साठवून ठेवली होती. कारची आग, गॅस सिलेंडरचे स्फोट आणि रसायने या तिन्ही घटकांमुळे घरात आगडोंब उडाला. घरात झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
इलेक्ट्रॉनिक लॉकने केला घात
दुर्दैवाची बाब म्हणजे घराला इलेक्ट्रॉनिक डिजिटल लॉक बसवण्यात आलं होतं. आगीमुळे घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हे डिजीटल लॉक उघडलं नाही. परिणामी, कुटुंबातील सदस्य आतच अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडावे लागले, मात्र तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
