झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात निधन झाले. 81 वर्षीय शिबू सोरेन यांना किडनीशी संबंधित आजारामुळे गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.
झारखंड राज्याच्या चळवळीचे नेते शिबू सोरेन
शिबू सोरेन हे मागील काही वर्षांपासून आजारी होते आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते.
advertisement
शिबू सोरेना यांना गुरुजी ही ओळख झारखंडमधून मिळाली. झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापकांपैकी एक होते. आदिवासींच्या अधिकारासाठीच्या लढाईतील ते अग्रणी होते. झारखंड राज्याच्या चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले. झारखंड राज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी तीन वेळेस राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
शिबू सोरेन यांच्या नेतृत्वातील चळवळीने आदिवासी भागात सामाजिक आणि राजकीय प्रबोधन केले. त्यांनी झारखंडला वेगळी, स्वतंत्र ओळख देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
आज मी शून्य झालो.... झारखंडचे मुख्यमंत्री भावूक
शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्वतः दिल्लीत उपस्थित आहेत. शिबू सोरेन यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. वडिलांच्या निधनानंतर हेमंत सोरेन यांनी गुरुजींच्या निधनाने आज मी शून्य झालो असल्याचे सांगितले.
झारखंडवासियांचे गुरुजी....
शिबू सोरेन हे झारखंडच्या राजकारणात गुरुजी होते. लहान असो वा मोठे, सर्वजण शिबू सोरेन यांना 'गुरुजी' म्हणून संबोधत. त्यांनी 1 970 च्या दशकात झारखंडच्या आदिवासी समुदायाला सावकारांच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी एक चळवळ सुरू केली. त्यांचे वडील सोबरन मांझी यांच्या हत्येने त्यांना सामाजिक आणि राजकीय संघर्षाच्या मार्गावर आणले. त्यांनी 1973 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी झारखंडला वेगळे राज्य बनवण्यासाठी अनेक दशके संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फलित म्हणजे 2000 मध्ये झारखंड बिहारपासून वेगळे झाले. शिबू सोरेन यांनी दुमका येथून आठ वेळा लोकसभा खासदार आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री देखील होते. सोरेन यांची राजकीय कारकीर्दही काही वादांनी झाकोळली गेली.