हत्या झालेल्या दोन्ही महिलांची ओळख एलेना वानेएवा (Elena Vaneeva) आणि एलेना कास्थानोव्हा (Elena Kasthanova) अशी असून, त्या दोघीही रशियन नागरिक होत्या आणि आरोपी अलेक्सेईच्या मैत्रिणी होत्या. यापैकी एलेना कास्थानोव्हा ही एक फायर डान्सर होती. तिने अलेक्सेईकडून काही रक्कम आणि एक ‘फायर क्राउन’ (डोक्यावर आग धरण्यासाठी वापरला जाणारा रबरचा मुकुट) उधार घेतला होता. आरोपी अलेक्सेई स्वतः फायरवर्क आर्टिस्ट म्हणून काम करत होता. दुसरी महिला एलेना वानेएवानेही आरोपीकडून काही रक्कम उधार घेतली होती, असे सूत्रांनी सांगितले.
advertisement
मात्र दोन्ही महिलांनी उधार घेतलेली रक्कम आणि फायर क्राउन परत न केल्याने अलेक्सेई संतप्त झाला. याच रागातून त्याने दोघींची वेगवेगळ्या दिवशी निर्घृण हत्या केल्याचा संशय आहे. पोलीस सूत्रांनुसार आरोपीने 14 जानेवारी रोजी आणि 15 जानेवारी रोजी दोन्ही महिलांच्या त्यांच्या खोलीत गळा चिरून हत्या केली.
सूत्रांनी स्पष्ट केले की या हत्या आधीपासून नियोजनबद्ध नव्हत्या, तर त्या “क्षणिक रागातून घडलेल्या (triggered murders)” होत्या. अलेक्सेई हा अतिशय ‘obsessed’ स्वभावाचा असून, तो लवकर चिडणारा असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस सध्या या बाबीचा तपास करत आहेत की, हत्या करताना आरोपी अलेक्सेई अंमली पदार्थांच्या नशेत होता का. सूत्रांच्या माहितीनुसार एलेना वानेएवा ही बबल आर्टिस्ट होती आणि ती 10 जानेवारी रोजी गोव्यात आली होती. तर एलेना कास्थानोव्हा ही 25 डिसेंबरपासून गोव्यात राहत होती आणि ती आरोपी अलेक्सेईसोबतच वास्तव्यास होती. दोन्ही महिला आणि आरोपी हे देशातील विविध भागांमध्ये काम करत असत आणि गोव्यात वारंवार ये-जा करत असत, असेही पोलिसांनी सांगितले.
अलेक्सेईकडे दीर्घकालीन भारतीय व्हिसा
पोलीस सूत्रांनुसार अलेक्सेईकडे भारतासाठी दीर्घकालीन व्हिसा होता. तो याआधी भारतातील अनेक शहरांमध्ये राहून काम करत होता. डिसेंबर महिन्यात तो पुन्हा गोव्यात परतला होता आणि त्यानंतर वारंवार गोव्यात वास्तव्य करत होता. तो छोट्या-मोठ्या कामांतून उपजीविका करत असे आणि दिवसभर प्रवास करत राहायचा, असेही तपासात समोर आले आहे. मात्र गेल्या जवळपास एक महिन्यापासून आरोपी कोणतेही काम करत नव्हता.
सिरियल किलर असल्याचा दावा?
या प्रकरणाला आणखी धक्का देणारी माहिती म्हणजे, आरोपी अलेक्सेईने पोलिसांकडे दावा केला आहे की त्याने याआधीही काही वादांमुळे पाच जणांची हत्या केली आहे आणि त्यांची नावेही त्याने सांगितली. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित पाचही व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोपीच्या मानसिक स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलीस सूत्रांच्या मते अलेक्सेई मानसिक आजाराने ग्रस्त असून तो नेहमीच अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असायचा. आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना तब्बल 100 हून अधिक महिलांचे आणि दोन पुरुषांचे फोटो सापडले आहेत.
पोलीस तपासानुसार अलेक्सेई लवकर चिडणारा असला तरी तो लोकांशी पटकन मैत्रीही करायचा. यापूर्वी गोव्यात काही पुरुषांसोबत त्याचे मारहाणीचे वाद झाले होते. मात्र त्याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.
आसामच्या महिलेच्या मृत्यूशीही संबंध?
दरम्यान गोवा पोलीस आरोपी अलेक्सेईचा आणखी एका महिलेच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचाही तपास करत आहेत. ही महिला म्हणजे मृदुस्मिता सैंकीया (Mridusmita Sainkia) आसामची रहिवासी, जी 12 जानेवारी रोजी गोव्यात आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार मृदुस्मिता आणि अलेक्सेई एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत होते आणि ते अनेकदा एकत्र गोव्यात येत असत. 11 जानेवारी रोजी म्हणजे मृदुस्मिता मृत आढळण्याच्या एक दिवस आधी; ती आणि अलेक्सेई एकत्र होते, अशी माहितीही समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार मृदुस्मिताचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अति सेवनामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
