दुबई प्रवासावरून न्यायालयाचे प्रश्न
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुईयां यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा आला. तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी दिल्ली आणि नंतर दुबई येथे शारीरिक संबंध ठेवले. यावर सुनावणीदरम्यान खंडपीठाने दुबई प्रवासाबाबत प्रश्न उपस्थित केले. हे संबंध परस्पर संमतीने झालेले दिसतात. आम्ही कदाचित जुन्या विचारांचे असू, पण लग्नाआधी मुलगा-मुलगी पूर्णपणे परके असतात. अशा नात्यांबाबत सावध राहणे गरजेचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने केले.
advertisement
न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, नात्यात कितीही जवळीक असली तरी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. लग्नाआधी कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये.
मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख
महिलेच्या वकिलांनी सांगितले की, दोघांची ओळख 2022 मध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर झाली होती. त्यानंतर आरोपीने वारंवार लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या संमतीशिवाय खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महिलेचा दावा आहे की, जानेवारी 2024 मध्ये आरोपीने पंजाबमध्ये दुसऱ्या महिलेशी विवाह केला असल्याचे तिला नंतर समजले.
मध्यस्थीचा पर्याय तपासा
खंडपीठाने या प्रकरणात परस्पर संमतीचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. अशा प्रकरणांत थेट खटला चालवून शिक्षा देण्यापेक्षा तोडगा काढण्याचा मार्ग पाहायला हवा, असे निरीक्षण करत न्यायालयाने दोन्ही पक्षांना मध्यस्थीचा पर्याय सुचवला. आरोपीच्या वकिलांना संभाव्य तडजोडीचे पर्याय तपासण्याचे निर्देश देण्यात आले असून, महिलेला नुकसानभरपाई देण्याचाही पर्याय विचारात घ्यावा, असे न्यायालयाने सूचित केले. दोन्ही बाजूंची भूमिका नोंदवण्यासाठी पुढील सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे.
