मृतांचा आकडा वाढला
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात असलेल्या पाशमायलारम इंडस्ट्रियल इस्टेटमधील सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये सोमवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सोमवारी रात्री उशिरापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती, मात्र आता मृतांचा आकडा वाढला असून 34 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
DNA टेस्ट होणार
या दुर्घटनेत मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. त्यामुळे ओळख पटवणं कठीण होत असून DNA टेस्ट केली जाणार आहे. आतापर्यंत फक्त तीन मृतदेहांची ओळख पटली आहे. सहा मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या मृतदेहांची ओळख डीएनए प्रोफाइलिंगद्वारे केली जाईल. तसंच, इतर तीन मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अशी माहिती तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
तेलंगणा आपत्कालीन व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवा विभागाचे महासंचालक वाय. नागी रेड्डी यांनी सांगितले की, ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, नेमकी आग कशी लागली याचं कारण शोधलं जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, तज्ज्ञांचे मत आहे की, फॅक्टरीतील ड्रायिंग युनिटमध्ये (drying unit) दाब वाढल्याने हा स्फोट झाला असावा. सुकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सामानातील काही वस्तूंचा स्फोट झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या स्फोटात तीन मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मदतीची घोषणा
या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींनी 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'तून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.