त्रिशूर: केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाने एक मोठा आणि धक्कादायक उलटफेर करत काँग्रेसचा पराभव केला आहे. त्रिशूर महानगरपालिकेतील कन्ननकुलंगरा वॉर्डातून भाजपाच्या मुस्लिम उमेदवार मुमताज यांनी विजय मिळवला आहे.
advertisement
कन्ननकुलंगरा हा हिंदूबहुल वॉर्ड मानला जातो. अशा ठिकाणी भाजपाच्या मुस्लिम उमेदवाराने काँग्रेसकडून जागा जिंकणे हे राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्रिशूर महानगरपालिकेत भाजपाकडून मुमताज या एकमेव मुस्लिम उमेदवार होत्या.
मुमताज गेल्या आठ वर्षांपासून भाजपाशी सक्रियपणे जोडलेल्या आहेत. त्या आणि त्यांचे कुटुंब दीर्घकाळापासून पक्षाचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. मागील दोन वर्षांत मुमताज यांना भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चामध्ये जबाबदारी देण्यात आली होती. त्या काळात त्यांचे कार्यक्षेत्र चेन्नई येथे होते.
व्यवसायाने मुमताज या उद्योजिका असून त्रिशूरमध्ये त्या पेट ग्रूमिंग शॉप चालवतात. आपल्या विजयानंतर त्यांनी सांगितले की, हा विजय म्हणजे शहराची सेवा करण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळेच आपण भाजपाशी जोडले गेलो, असेही त्यांनी यापूर्वी नमूद केले होते.
भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून मुमताज यांनी अनेक पक्षीय मोहिमा आणि निवडणूक प्रचारात सहभाग घेतला आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेले सुरेश गोपी यांच्या नेतृत्वाखालील प्रचारातही त्या सक्रिय होत्या. कन्ननकुलंगरा वॉर्डमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सिंधू चक्कोलायिल यांचा पराभव केला.
यंदाच्या त्रिशूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग देखील लक्षवेधी ठरला. एकूण 28 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. ज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांची उपस्थिती अधिक ठळक झाली आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना मुमताज म्हणाल्या, “मी गेल्या आठ वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला कारण मी लोकांपर्यंत पोहोचू शकते. माझा व्यवसाय असो किंवा वैयक्तिक आयुष्य, मी समाजाशी नेहमीच जोडलेली राहिले आहे.”
दरम्यान केरळमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या 1,199 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून प्रथम टपाल मतांची आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जात आहे. ही प्रक्रिया 244 मतमोजणी केंद्रांवर आणि 14 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू आहे.
या निवडणूक निकालांमुळे 2026 मधील केरळ विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या रणनीती आणि प्रचाराची दिशा निश्चित होणार आहे. निवडून आलेल्या पंचायत सदस्य आणि नगरसेवकांचा शपथविधी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
