सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात रहिवासी असलेले चंद्रकांत शेवाळे, वय 27, या तरुणाचे शिक्षण टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपर्यंत झाले आहे. चंद्रकांत यांनी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चंद्रकांत यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला, पण कोरोना काळात पसरलेल्या चिकन खाल्ल्याने कोरोना होत आहे या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायात चंद्रकांत यांचं नुकसान झालं. त्यामुळे चंद्रकांत यांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केला.
advertisement
काही दिवस विचार केला की असा कोणता व्यवसाय आहे, यामध्ये आपण स्वतः त्याचा दर निश्चित करू शकतो. हा अभ्यास करून त्यांनी शेवटी बंदिस्त शेळी पालन करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला उस्मानाबादी शेळ्या आणि बीटल जातीच्या 5 ते 8 शेळ्या आणून चंद्रकांत यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. आज चंद्रकांत यांच्याकडे बीटल जातीच्या 20 शेळ्या व 35 लहान शेळ्यांची पिल्ले असून, ब्रेडिंगसाठी दोन बोकड आहेत.
सध्या चंद्रकांत हे क्वांटिटी वाढवण्याऐवजी क्वालिटीवर काम करत आहेत. सर्वसाधारण एका शेळीला 2 पिल्ले होतात, आठ महिन्यांचा एक वेत असतो, एका पिलाची किंमत साधारणतः 20 हजार रुपये इतकी असते. दोन शेळ्यांच्या पिल्लांची किंमत 40 हजार रुपये इतकी होते. 20 शेळ्यांमागे 35 ते 40 शेळ्यांची पिल्ले होतात, तर या शेळ्यांच्या पिल्लांच्या विक्रीतून जवळपास आठ लाख रुपयांची उलाढाल होते. सर्व खर्च वजा करून 5 लाख रुपये या बंदिस्त शेळीपालनातून मिळत असल्याची माहिती उच्चशिक्षित तरुण चंद्रकांत शेवाळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.





