ही घटना राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात घडली. येथील एका आयटी कंपनीच्या महिला व्यवस्थापकावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेने तिच्याच कंपनीच्या सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीवर आरोप केले आहेत. पोलिसांनी काल रात्री उशिरा तिन्ही आरोपींना अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २० डिसेंबरच्या रात्री सुखेर परिसरात घडली, जेव्हा ही महिला कंपनीच्या सीईओच्या वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या पार्टीला उपस्थित राहून घरी परतत होती. महिलेने सांगितले की पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली आणि मोठ्या प्रमाणात दारू प्यायली गेली. महिला कार्यकारी प्रमुखाने तिला तिच्या कारमध्ये बसवले, तेव्हा ती बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होती. कार्यकारी प्रमुखाचा पती आणि सीईओ देखील गाडीत होता.
advertisement
असा आरोप आहे की वाटेत महिलेला दारूसारखं दिसणारा पदार्थ देण्यात आला, ज्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेला कळले की तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींनी तिला पहाटे ५ वाजताच्या सुमारास घरी सोडलं.
पीडितेच्या गुप्तांगावर जखमा होत्या आणि तिच्या काही वैयक्तिक वस्तू गायब होत्या. तरुणीने कारच्या डॅशकॅमचा ऑडिओ आणि व्हिडिओ तपासला, ज्यामध्ये सीईओ, महिला कार्यकारी अधिकारी आणि तिच्या पतीच्या कृती रेकॉर्ड झाल्या होत्या. पीडितेने २३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. महिला गुन्हे विभागाच्या एएसपी माधुरी वर्मा यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.
