पाटणा/नवी दिल्ली: नेपाळमध्ये सरकारविरोधी हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर बिहारला लागून असलेल्या सात जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये पश्चिम चंपारण, सीतामढी, मधुबनी, अररिया, सुपौल, पूर्व चंपारण आणि किशनगंज यांचा समावेश आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने सांगितले की- सीमेवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे आणि सीमा सुरक्षा दलाला (SSB) सतर्कतेचा (alert) आदेश देण्यात आला आहे.
advertisement
अररियाचे पोलीस अधीक्षक अंजनी कुमार यांनी सोमवारी सांगितले की- नेपाळमधील परिस्थिती पाहता जिल्ह्याच्या सीमेवर तैनात पोलीस आणि एसएसबीच्या जवानांना कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमावर्ती पोलीस स्टेशन क्षेत्रांमध्ये सतत निगराणी वाढवण्यात आली आहे आणि सीमेपलीकडील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे ते म्हणाले.
एसएसबीच्या 52व्या बटालियनचे कमांडंट महेंद्र प्रताप यांनीही सांगितले की- सध्या बिहारला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवर शांतता आहे. पण सुरक्षा दल पूर्णपणे ‘अलर्ट मोड’मध्ये आहेत. जवान सीमेवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत आणि स्थानिक प्रशासनासोबत सतत संपर्कात आहेत.
हिंसाचारात 20 लोकांचा मृत्यू
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ राजधानी काठमांडू आणि इतर काही भागांमध्ये सोमवारी तरुणांनी हिंसक निदर्शने केली. या निदर्शनांदरम्यान किमान 20 लोकांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. देशातील सध्याची परिस्थिती पाहून नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
परिस्थिती बिघडल्यानंतर नेपाळी लष्कराला राजधानी काठमांडूमध्ये तैनात करण्यात आले आहे. लष्कराच्या जवानांनी नवीन बनेश्वरमधील संसद परिसराच्या आसपासच्या रस्त्यांवर नियंत्रण मिळवले आहे. यापूर्वी काठमांडूमध्ये ‘जेन-झी’ (Gen-Z) च्या बॅनरखाली शालेय विद्यार्थ्यांसह हजारो तरुण संसद भवनासमोर जमले आणि त्यांनी बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी करत सरकारविरोधी घोषणा दिल्या.