व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतं?
OSINT TV ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हारिस डार प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांशी थेट संवाद साधताना दिसतो. तो त्यांच्या कौशल्यांबाबत चौकशी करत असून, या युवकांना स्कूबा डायव्हिंग, व्यावसायिक पोहणे, हाय-स्पीड बोट हाताळणी आणि रेस्क्यू ड्रिल्स यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. व्हिडीओमध्ये उपस्थित असलेला आणखी एक दहशतवादी नेता अभिमानाने सांगतो की, तब्बल 135 जणांना नौकाचालन आणि पाण्यातून ऑपरेशन्स करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. चौकशीदरम्यान हारिस डार युवकांकडून त्यांच्या मार्शल आर्ट्स आणि आत्मसंरक्षण कौशल्यांबाबतही माहिती घेताना दिसतो.
advertisement
PMML आणि लष्कर-ए-तैयबाचा ‘राजकीय’ चेहरा
या व्हिडीओमध्ये दहशतवादी नेते पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML)चा उल्लेख करताना ऐकू येतात. विशेष म्हणजे PMML हा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या लष्कर-ए-तैयबा संघटनेचाच एक राजकीय मुखवटा असल्याचे सर्वज्ञात आहे. व्हिडीओमध्ये हे नेते भारतीय माध्यमांकडून बहावलपूरमध्ये सुरू असलेल्या मोटरबोट प्रशिक्षणाबाबत दाखवण्यात येणाऱ्या बातम्यांची खिल्ली उडवत आहेत. यावरून त्यांच्या बेधडक वृत्तीचा आणि पाकिस्तानमधील मोकळ्या हालचालींचा प्रत्यय येतो.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा ठोस प्रत्युत्तर
हा व्हिडीओ अशा काळात समोर आला आहे, जेव्हा पाकिस्तान सातत्याने स्वतःला दहशतवादाचा बळी असल्याचे भासवत आहे. मात्र भारताने आता आपली धोरणात्मक भूमिका बदलली आहे. मे 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. यामध्ये बहावलपूरमधील मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेचे मुख्यालयही लक्ष्य करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे याच बहावलपूरमध्ये आता लष्कर-ए-तैयबा आपल्या नव्या ‘वॉटर फोर्स’ची उभारणी करत असल्याचा दावा करत आहे.
