गुवाहाटी: आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी नूपुर बोरा सध्या एका धक्कादायक प्रकरणामुळे चर्चेत आहेत. एका मोठ्या जमीन घोटाळ्यात सामील असल्याच्या आरोपाखाली 36 वर्षीय या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या विशेष दक्षता पथकाने त्यांच्या गुवाहाटी आणि बारपेटा येथील घरांवर छापे टाकले. ज्यात 92 लाख रुपये रोख आणि सुमारे 2 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. बारपेटा येथील त्यांच्या भाड्याच्या घरातून आणखी 10 लाख रुपये सापडले.
advertisement
कोण आहेत नूपुर बोरा?
1989 मध्ये आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात जन्मलेल्या नूपुर बोरा यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आणि त्यानंतर कॉटन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (DIET) लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या. 2019मध्ये त्यांची ACS अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यांनी करबी आंगलांग येथे सहायक आयुक्त म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2023 मध्ये त्यांची बदली बारपेटा येथे सर्कल अधिकारी म्हणून झाली आणि सध्या त्या कमरूप जिल्ह्यातील गोराईमारी येथे कार्यरत होत्या. अवघ्या सहा वर्षांच्या नोकरीत त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती कशी जमा केली, हा एक मोठा प्रश्न आहे.
जमीन घोटाळ्याचे प्रकरण काय आहे?
नूपुर बोरा गेल्या सहा महिन्यांपासून दक्षता पथकाच्या रडारवर होत्या. बारपेटा येथे कार्यरत असताना त्यांच्यावर सरकारी आणि मठ (सत्र) जमिनी बेकायदेशीरपणे संशयास्पद लोकांना हस्तांतरित करण्याचा आरोप आहे. आरोपानुसार या अधिकाऱ्याने हिंदूंच्या मालकीची जमीन पैशांच्या मोबदल्यात संशयास्पद लोकांना हस्तांतरित केली. स्थानिक संघटना ‘कृषक मुक्ती संग्राम समिती' (KMSS) ने नूपुर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले. तक्रारीत असा दावा करण्यात आला होता की, त्या जमीन-संबंधित कामांसाठी 1,500 ते 2 लाख पर्यंत लाच घेत असत.
घरातून सापडला कोट्यवधींचा खजिना
मुख्यमंत्री यांच्या दक्षता पथकाने नूपुर यांच्या गुवाहाटी येथील गोटानगरमधील फ्लॅटवर आणि बारपेटा येथील भाड्याच्या घरात छापा टाकला. गुवाहाटी येथील घरात 92 लाख रुपये रोख आणि 2 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. तर बारपेटा येथून 10 लाख रुपये मिळाले. याव्यतिरिक्त त्यांचा कथित सहकारी आणि बारपेटा येथील महसूल मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या सुरजीत डेका यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. डेकावर नूपुर यांच्या मदतीने बारपेटा येथे अनेक जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे.
दक्षता पथकाच्या एसपी रॉसी कलिता यांनी दिलेल्या माहितीनुसार- तपास अजूनही सुरू आहे आणि या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. नूपुर बोरा यांच्या अटकेमुळे आसाममधील प्रशासकीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकेकाळी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नूपुर बोरा आता अशा घोटाळ्यात अडकल्या आहेत. ज्यामुळे केवळ त्यांची प्रतिष्ठाच नाही, तर नागरी सेवांवरील जनतेचा विश्वासही डळमळीत झाला आहे.