देश स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठं बलिदान दिलं. त्यांनी इंग्रजांचा लाठीमार सहन केला आणि छातीवर गोळ्या झेलल्या. अगदी जाहीरपणे फाशीदेखील स्वीकारली. महात्मा गांधींची अहिंसा चळवळ हे सर्वांत मोठं शस्त्र म्हणून उदयास आलं. ब्रिटनवरचा दबाव वाढला. जुलै 1945 मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून क्लेमंट ॲटली पंतप्रधान झाले. त्यांनी विन्स्टन चर्चिलचा पराभव केला. पंतप्रधान झाल्यानंतर ॲटली यांनी फेब्रुवारी 1947 मध्ये घोषणा केली होती, की 30 जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे इंग्रजांकडे भारताला स्वतंत्र करण्यासाठी 30 जून 1948 पर्यंत वेळ होता.
advertisement
दरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांच्यात 'भारत-पाकिस्तानची फाळणी' या मुद्द्यावरून वाद सुरू होता. जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान या देशाची मागणी केल्यामुळे नागरिकांमध्ये संघर्षाची भीती वाढत होती. हे लक्षात घेऊन ब्रिटिश राजवटीने 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला.
स्वातंत्र्यदिनाआधी पोलिसांची मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूलचा दहशतवादी अटकेत
क्लेमंट ॲटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती; पण आता ब्रिटनमध्ये अशा कायद्याची गरज होती ज्याद्वारे भारताला स्वातंत्र्य देता येईल. यासाठी कायदा बनवण्याची जबाबदारी तत्कालीन भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्यावर सोपवण्यात आली होती. माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची योजना मांडली होती. त्याला 'माउंटबॅटन प्लॅन' असंही म्हणतात. या योजनेअंतर्गत स्वातंत्र्य देण्याबरोबरच भारताचे दोन तुकडे करायचे होते. या योजनेअंतर्गत मुस्लिमांसाठी पाकिस्तान हा नवा देश तयार होणार होता.
माउंटबॅटनच्या योजनेवर आधारित भारतीय स्वातंत्र्य कायदा तयार करण्यात आला. ब्रिटिश संसदेने (ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्स) 5 जुलै 1947 रोजी त्याला मंजुरी दिली. यानंतर 18 जुलै 1947 रोजी ब्रिटनचे राजे जॉर्ज सहावे यांनीही या कायद्याला मान्यता दिली. यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं.
बांगलादेश संघर्षात शेख हसीना यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; घरात घुसून लावली आग
15 ऑगस्ट हा दिवस भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी निवडण्यात आला होता. व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या आयुष्यात या दिवसाचं विशेष महत्त्व होतं. दुसऱ्या महायुद्धात 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने ब्रिटनसह मित्रराष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती. या दिवशी जपानचे राजा हिरोहितो यांनी रेकॉर्ड केलेला रेडिओ संदेश प्रसिद्ध करून मित्रराष्ट्रांसमोर शरणागती स्वीकारली होती. तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिश सैन्यात मित्रराष्ट्रांचे कमांडर होते. त्यामुळे जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचं संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आलं. 15 ऑगस्ट या दिवसाला माउंटबॅटन आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम आणि शुभ दिवस मानत होते. म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.