पालिका आयुक्तांचा कडक पवित्रा
डोंबिवली शहरातील पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर सोमवारी पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने कारवाई केली. स्थानकाच्या 150 मीटर परिसरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे स्टॉल आणि सामान जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अनेक फेरीवाल्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्या भागात झाली कारवाई
ही कारवाई डोंबिवली पूर्वेतील पंडित नेहरू रस्ता, बापूसाहेब फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, पाटकर रस्ता तसेच चिमणी गल्ली या भागात करण्यात आली. अनेक भाजीपाला, फळ विक्रेते आणि इतर छोटे विक्रेते या ठिकाणी ठेले लावून व्यवसाय करत होते. पालिकेच्या पथकाने या ठिकाणी पोहोचून त्यांचे ठेले हटवले आणि काही विक्रेत्यांचे सामान जप्त केले.
advertisement
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानकाजवळील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, फेरीवाला हटाव पथक प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
दरम्यान या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानकाच्या 150 मीटर परिसरात काही महिलांना खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी दिली जाते तसेच काहींना राजकीय पाठबळ मिळते. मग आमच्यावरच कारवाई का केली जाते, असा सवाल काही फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे.
