“प्रत्येकाला व्हिसा इंटरव्ह्यु अपॉइंटमेंटची योग्य संधी मिळावी आणि वेटिंग टाईम कमी करण्यासाठी आम्ही काही बदल करत आहोत,” असं अमेरिकन दुतावासाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा हजारो भारतीय ‘टेकीं’ना फायदा होईल. अमेरिकेत पायउतार होत असलेल्या बायडेन सरकारने H-1B व्हिसाचे नियम शिथिल करून अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी नोकरदारांना नोकरीवर ठेवण्यासाठी एक सोय करून दिली आहे, असं मानलं जात आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशातील कुशल लोकांना नोकरीवर ठेवू शकतील, जेणेकरून F-1 स्टुडंट व्हिसावर असलेल्या भारतीय लोकांना H-1B व्हिसा मिळवून अमेरिकेत नोकरी करू शकतील.
advertisement
अमेरिकन दूतावासाने म्हटलं की व्हिसा रिशेड्युलिंग पॉलिसींमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. व्हिसा अर्जदार आता त्यांच्या अपॉइंटमेंट्स मोफत रिशेड्युल करू शकतील. जर काही कारणांनी त्यांची अपॉइंटमेंट चुकली असेल किंवा दुसऱ्यांदा शेड्युल करण्याची गरज असेल तर त्यांना ॲप्लिकेशन फी रीपे करावी लागेल.
“1 जानेवारी 2025 पासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी तुमची पहिली नॉन-एमिग्रंट व्हिसाची अपॉइंटमेंट शेड्युल करू शकता. तुम्हाला कोणत्याही कारणाने अपॉइंटमेंट रिशेड्युल करायची असेल तर तुम्ही ते एकदाच मोफत करू शकाल. तुमची अपॉइंटमेंट चुकल्यास किंवा दुसऱ्यांदा रिशेड्युल करण्याची गरज भासल्यास तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि तुमची ॲप्लिकेशन फी परत भरावी लागेल. वेटिंग टाईम खूप जास्त आहे, त्यामुळे सर्वांनी निवडलेल्या तारखेला अपॉइंटमेंटसाठी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी,” असं अमेरिकन दूतावासाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“या बदलांमुळे प्रत्येकाला अपॉइंटमेंट मिळणं सोपं आणि फास्ट होईल. या प्रक्रियेत काहीही अडचण येऊ नये व सुरळीत पार पडावी, यासाठी सर्वांना त्यांनी घेतलेल्या अपॉइंटमेंटसाठी उपस्थित राहण्याची विनंती करत आहोत," असंही पोस्टमध्ये लिहिलं आहे.
