अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन समुदायांमध्ये पाच दिवसांपूर्वी वाद सुरू झाला होता; मात्र दोन गटांतला हिंसाचार अद्याप संपला नाही. या घटनेनंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हिंसाचार सुरूच आहे.
कुर्रमचे डेप्युटी कमिश्नर जावेदुल्लाह मेहसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन जमातींमधल्या वादात 36 जण ठार झाले असून 162 जण जखमी झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून खैबर पख्तुनख्वामधल्या कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार सुरू आहे. खैबर पख्तुनख्वा अफगाणिस्तानला लागून आहे. अधिकाऱ्यांनी शिया व सुन्नी या दोन्ही समुदायांतले नेते, मिलिटरी लीडरशिप, पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शिया व सुन्नी गटांमध्ये करार घडवून आणला आहे. बोशेरा, मालीखेल आणि दंडार जिल्ह्यांनी या करारावर सही केली आहे.
advertisement
एकमेकांवर डागले मोर्टार आणि रॉकेट
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही समुदायांनी एकमेकांवर अत्याधुनिक शस्त्रांनी फायरिंग केलं व मोर्टार डागलं. पराचीनार व साड्डासह इतर भागात एकमेकांवर मोर्टार शेल्स आणि रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आला. कुर्रम भागात विविध समुदायाच्या व्यक्ती राहतात.
एका अधिकाऱ्याने सांगितलं, की इतर भागांमध्ये या लोकांमध्ये शांतता घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाच दिवसांपूर्वी जमिनीच्या तुकड्यावरून शिया व सुन्नी समुदायात हिंसाचार सुरू झाला होता. हा हिंसाचार लवकरच पीवर, टांगी, बालिशखेल, खार कलाय, मकबल, कुंज अलीजाई, पारा चमकानी व करमन या भागात पसरला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून दोन समुदायांमध्ये चार वेळा वादाला तोंड फुटलं. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराचं स्वरूप पाहता सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच दिवसा वाहतूकही बंद करण्यात आली आहे. प्रभावित भागात मोठ्या प्रमाणात पोलीस व सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत.
