1940मध्ये दुसरं महायुद्ध टिपेला पोहोचलं होतं. अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधात जपानने जर्मनीशी हातमिळवणी केली होती. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेतल्या पर्ल हार्बर बेटावर हवाई हल्ला केला. अमेरिकन नौदल तळावरचे 2400 जण त्यात मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामोस वाळवंटात अणुबॉम्ब बनवण्यासाठी गुप्त मोहीम सुरू केली. या मोहिमेचं नेतृत्व फिजिसिस्ट जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी केलं होतं. मे 1945 मध्ये हिटलरच्या मृत्यूनंतर जर्मनीने मित्रराष्ट्रांसमोर शरणागती पत्करली; पण जपानने लढाई सुरूच ठेवली.
advertisement
6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेच्या हवाई दलाने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. त्यामध्ये प्रचंड विध्वंस झाला. यानंतर तीन दिवसांनी नागासाकीवर दुसरा बॉम्ब टाकण्यात आला. या बॉम्बला 'लिटल बॉय' असं नाव देण्यात आलं होतं. दोन्ही हल्ल्यांमध्ये 2 लाख 10 हजार जण मारले गेल्याचा अंदाज आहे. 79 वर्षांनंतरही हे हल्ले आठवून 'हिबाकुशां'चा थरकाप उडतो. चिको किरियाके सांगतात, की हल्ल्यापूर्वी अमेरिकेने हिरोशिमावर आकाशातून इशारा देणारी पत्रकं फेकली होती.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रुमन यांनी इशारा दिला होता, की लवकर शहर सोडा नाही तर मोठा बॉम्ब टाकला जाईल. जपानी लोकांनी हा इशारा गांभीर्याने घेतला असता तर कदाचित अनेकांचा जीव वाचला असता. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर शहरावर धुळीचे मोठे ढग जमा झाले होते आणि 17 हजार मीटर उंचीपर्यंत पसरले होते.
सर्वत्र काळोख पसरला होता 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावरचं काहीही दिवस नव्हतं. हल्ल्यानंतर तासाभरानंतर अंधार थोडा कमी झाला. त्या वेळी एक स्त्री चिको किरियाके यांना त्यांच्या दिशेने येताना दिसली. तिचं संपूर्ण शरीर रक्तानं माखलं होतं. तिने दोन्ही हातांनी तिचे स्तन पकडून ठेवले होते. रडत-रडत तिने हॉस्पिटलची विचारणा केली होती.
आणखी एक हिबाकुशा मिचिको कोडामा हल्ल्याच्या वेळी शाळेत होत्या. डेस्कखाली लपूनही त्या जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यानंतर हाहाकार उडाला होता. तेजस्वी प्रकाशात नागरिक इतके भाजले होते, की त्यांच्या शरीराचे अवयव अक्षरशः वितळून खाली पडत होते. एक लहान मूल कोळशासारखं आपल्या आईच्या कुशीतच जळून गेलं होतं. आजही या गोष्टी आठवल्या, की त्यांचा थरकाप उडतो.
