विशेषतः एका चिनी औषधाची मागणी वाढीला लागल्यामुळे गाढवांचं मास किलिंग अर्थात मोठ्या प्रमाणावर हत्या केली जात आहे. दर वर्षी यासाठी तब्बल साठ लाख गाढवांना ठार केलं जातं, असा अंदाज आहे. संबंधित रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे, की मास किलिंगमुळे चीनमध्ये गाढवांच्या संख्येत मोठी घट झाली असून, त्यामुळे गाढवांच्या कातड्याशी निगडित उद्योग आता आफ्रिकी देशांमध्ये वाढू लागले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊ या. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
चीनमध्ये हे औषध बऱ्याच काळापासून वापरलं जातं. या औषधाच्या फायद्यांबद्दल जगभरात प्रचार-प्रसार झाल्यानंतर जागतिक पातळीवर या औषधाची मागणी वाढली. हे औषध गाढवांच्या कातडीतून मिळणाऱ्या जिलेटिनपासून बनवलं जातं. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की गाढवांच्या कातड्याचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती ज्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाढवांची कत्तल करतात, त्या घटकाला एजिआओ असं म्हटलं जातं.
हे औषध कित्येक शतकांपासून चीनमध्ये वापरलं जात आहे. या औषधामुळे शरीर तर सक्रिय होतंच; पण त्याच्या नियमित सेवनामुळे लैंगिक दुर्बलता दूर होते. गाढवांच्या कातडीतून जिलेटिन काढण्यासाठी कातडं उकळलं जातं. त्यापासून नंतर पावडर, गोळ्या किंवा द्रव औषध तयार केलं जातं.
गेल्या सुमारे दशकभरापासून गाढवांच्या तस्करीला वेग आला आहे. पाकिस्तानात तर गाढवं जवळपास नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तान अतिरिक्त कमाईसाठी दर वर्षी चीनला लाखो गाढवं पाठवत आहे. म्हणून तिथे गाढवं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हा अवैध व्यापार रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये डाँकी सँक्चुअरी नावाची संस्था 2017 सालापासून याविरोधात सातत्याने चळवळ राबवत आहे.
भारतात या औषधाला किती मागणी आहे, त्या औषधाचा पुरवठा किती होतो, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. ब्रूक इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की 2010 ते 2020 या दशकात भारतात गाढवांची संख्या तब्बल 61.2 टक्क्यांनी घटली आहे.
