ब्राझीलमधल्या सँटो अँटोनिया दा प्लॅटिना या ठिकाणी 10 डिसेंबरला ही दुर्घटना घडली. कॅओ हेन्रिक डी लिमा गोंकाल्वेस असं मृत्यू झालेल्या 21 वर्षीय खेळाडूचं नाव आहे. जोस एल्युटेरियो दा सिल्व्हा स्टेडियममध्ये युनिडोस टीम विरुद्ध युनियाओ जॅइरेन्से टीम अशी फुटबॉल मॅच सुरू होती. गोंकाल्वेस हा खेळाडू युनियाओ टीममध्ये होता. सर्व खेळाडू अत्यंत तल्लीन होऊन मॅचमध्ये खेळत होते. तेवढ्यात अचानक आकाशातून वीज कोसळली आणि काही कळायच्या आत सात खेळाडू धराशायी झाले. सर्वांनाच धक्का बसला. संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञ त्यांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी मैदानावर धावले. हे सारं सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालं असून, त्याचा व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारा आहे.
advertisement
'द सन'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की मॅच सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू होता. असं वाटत होतं, की कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वीज कोसळू शकेल. 'द सन'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर केला आहे.
जखमी झालेल्या खेळाडूंना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. कॅओ हेन्रिक डी लिमा गोंकाल्वेस या खेळाडूचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. अन्य सहापैकी पाच खेळाडू स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सहावा खेळाडू गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रादेशिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.
सँटो अँटोनियो दा प्लॅटिना सिटी हॉलने गोंकाल्वेस या खेळाडूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाहीदेखील देण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात मेक्सिकोच्या किनारी भागात वीज कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता.
