रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरलं. यानंतर अवघ्या १० सेकंदात नियंत्रण सुटलेल्या विमानाचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेजू एअर लाइन्सचे विमान 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स यांना घेऊन थायलंडहून दक्षिण कोरियाला परतत होते. पण लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला. मुआन विमानतळ हे दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात आहे. स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये विमानाचा मोठा स्फोट झाल्याचं दिसत आहे.
advertisement
योनहाप न्यूज एजन्सीनुसार, हे विमान बँकॉकहून येत होते. विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमानतळावरील कुंपणाला विमान धडकलं. स्थानिक वेळेनुसार ही दुर्घटना सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी झाली. या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू असून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
