शहबाज शरीफ यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी संसदेत प्रस्ताव पारीत करण्याचं आवाहन केलं आहे. शहबाज पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान होणार आहेत. संसदेमध्ये शरीफ यांच्या समर्थनात 201 मतं मिळाली, तर विरोधी पीटीआय उमेदवार अयूब खानना 92 मतं मिळाली. शहबाज शरीफ यांनी शेजाऱ्यांसह सर्व राष्ट्रांसोबतचे संबंध चांगले करण्याची भूमिका मांडली, पण काश्मीरबाबत जुनाच अजेंडा कायम ठेवला.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रपती भवनात शहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील. शपथविधी सोहळ्याला सेना प्रमुख जनरल असीम मुनीर, कार्यवाहक पंतप्रधान अनवारुल हक काकर, मुख्यमंत्री आणि सर्व प्रांताचे राज्यपाल सहभागी होणार आहेत.
शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत काश्मीर, गाझा आणि फिलिस्तीनच्या मुद्द्यावर चर्चा केली. काश्मीरमध्ये काश्मिरी जनतेचं रक्त सांडत आहे, पूर्ण जग यावर शांत आहे, त्यांच्या शांततेचं कारण सगळ्यांना माहिती आहे, असा आरोप शरीफ यांनी केला आहे.
पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका झाल्या होत्या, यानंतर 3 आठवड्यानंतर सरकार स्थापन व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ आणि बिलावल भुट्टोंची पाकिस्तान पीपल्स पार्टी तसंच छोट्या पक्षांनी शहबाज शरीफ यांना पाठिंबा दिला आहे.
