हृदय, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट आता मोफत!
सध्या हृदय, किडनी, लिव्हर अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी रुग्णांना 10 ते 20 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. मात्र, आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे. या योजनेमुळे गोरगरिबांना जमीन विकायची किंवा कोणाकडे मदत मागायची वेळ येणार नाही. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे.
advertisement
राज्य सरकारने योजनेत मोठा बदल करत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यारोपणासाठी रुग्णालयांना पाच लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारा जादा खर्चही विशेष निधीतून भरता येणार आहे. अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड घालून संपूर्ण उपचार मोफत करण्यासाठी धोरण तयार करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत जलद गतीने कार्यवाही करण्यात येत आहे.
गरीब रुग्णांना मोठा दिलासा
हजारो रुग्णांना दरवर्षी अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, लाखोंच्या घरातील खर्चामुळे हे उपचार फक्त श्रीमंतांपुरतेच मर्यादित होते. आता महात्मा फुले योजनेत यांचा समावेश झाल्याने सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्यारोपण प्रक्रियांचा वेग वाढेल आणि मृत्युदरही कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एका रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाचा खर्च 25 ते 40 लाखांच्या घरात सांगितला जातो. त्यामुळे प्रत्यारोपण हा एक 'बाजार' बनला असल्याचा आरोप अनेक नातेवाईकांकडून केला जात होता. आता महात्मा फुले योजनेमुळे हा खर्च वाचणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे होणारे महत्त्वाचे फायदे
- अवयव प्रत्यारोपण मोफत मिळणार.
- 5 लाख रुपयांचे पॅकेज आणि विशेष निधीची तरतूद.
- प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.
- आर्थिक अडचणींमुळे आता उपचार थांबणार नाहीत.
हे ही वाचा : साताराकरांनो लक्ष द्या! कास जलवाहिनीला पुन्हा गळती; 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
हे ही वाचा : राखी बांधायला जायचंय? काळजी नको! सांगलीतून जादा बसेसची सोय, गर्दी पाहून फेऱ्या वाढवणार
