राखी बांधायला जायचंय? काळजी नको! सांगलीतून जादा बसेसची सोय, गर्दी पाहून फेऱ्या वाढवणार
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी...
सांगली : यंदा लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. सांगली जिल्ह्यात विविध मार्गांवर 70 जादा बसेसच्या 343 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून 27 हजार 257 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.
शनिवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने, या दिवशी रक्षाबंधनामुळे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सांगली विभागाकडून 9 ऑगस्ट रोजी आणि गर्दी पाहून 10 ऑगस्ट रोजीही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
बसस्थानकांवर कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक
या दिवसांमध्ये आगार व्यवस्थापक आणि सर्व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवासी गर्दीनुसार वाहतुकीचे नियोजन करायचे आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, विटा, कवठे महांकाळ, आटपाडी, पलूस यांसारख्या प्रमुख ठिकाणांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये सांगली-तुंग, विश्रामबाग, मिरज-मिशन हॉस्पिटल, अंकली, इस्लामपूर-पेठनाका, तासगाव-विटा नाका, कुमठे फाटा, विटा-भिवघाट, क. महांकाळ-नागज फाटा, आटपाडी-खरसुंडी, पलूस-ताकारी या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन मिळेल.
advertisement

फेऱ्यांमध्ये वाढ होणार
एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, दिलेल्या नियोजनानुसार फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. ज्या लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे भारमान (load factor) 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा फेऱ्यांची दोन्ही बाजूंची आरक्षण स्थिती तपासून जादा फेऱ्या चालवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नेहमी सुरू असलेल्या मार्गावरील वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या विशेष व्यवस्थेमुळे बहिण-भावांना रक्षाबंधनाच्या सणासाठी प्रवास करणे अधिक सोपे होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
राखी बांधायला जायचंय? काळजी नको! सांगलीतून जादा बसेसची सोय, गर्दी पाहून फेऱ्या वाढवणार


