आदिवासी, कोळी समाज, झोपडपट्टीवासीयांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लवकर सेवा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. शेलार म्हणाले, "सेवा पंधरवाडाअंतर्गत होत असलेल्या या कार्यक्रमात 'प्रधान सेवक' या भावनेतून लोकांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. फिरते 'सेतु' केंद्र हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचं अभिनंदन."
advertisement
374 आपले सरकार सेवा केंद्र
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली, कुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयांतील सुविधा केंद्र हे अत्यंत अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वॉर्डनिहाय 374 'आपले सरकार' सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच फिरते 'सेतु' केंद्र व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांना तत्काळ सेवेचा लाभ मिळावा यासाठी सर्व दाखले व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
काय आहे सेवा पंधरवडा अभियान?
छत्रपती शिवाजी महाराज 'महाराजस्व अभियानां'तर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालाधीमध्ये 'सेवा पंधरवाडा' अभियान राबवण्यात येत आहे.