विरोधकांकडून गदारोळ....
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी बाकांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना केली. त्याच दरम्यान विरोधी बाकांवरून महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलण्यास वेळ दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतरही सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू होती. केंद्र सरकार हिंदूविरोधी असल्याची घोषणाबाजी विरोधकांच्या बाकांवरून सुरू झाली. विरोधकांच्या गदारोळातच निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. काही वेळेनंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली.
advertisement
अर्थसंकल्पात 'ग्यान'वर भर...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष 'ग्यान'वर आहे. GYAN म्हणजे G - गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N - नारी शक्ती. आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रासाठी योजनांची घोषणा...
कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. राज्यांच्या साह्याने पंतप्रधान धन धान्य योजना राबवली जाणार आहे असे सीतारामण यांनी म्हटले. या योजनेच्या माध्यमातून 100 जिल्हयांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच इतर विविध योजना राबवल्या जाणार. उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार. तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
